Breaking News

अजिंक्यतारा कारखान्याचा विनाकपात 3 हजार पहिला हप्ता जाहीर.

जिल्ह्यात ऊसाला दर देणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने गाळपास येणा-या ऊसाला पहिला हप्ता 3 हजार रुपये प्रतिटन विनाकपात जाहीर करुन आघाडी घेतली आहे. कारखाना गाळपास येणा-या ऊसाला प्रतीटन 3 हजार रुपये विनाकपात पहिला हप्ता देत असून संबंधीत ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात सदर रक्कम जमा करण्यात आली असून उद्यापासून संबंधीत शेतकरी आपल्या बँक खात्यातून रक्कम काढू शकतील, असे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहिर केले. 


दरम्यान, जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्याची परंपरा अजिंक्यतारा कारखाना अखंडीत ठेवेल, असा विश्‍वासही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी व्यक्त केला.अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा सन 2017-18 चा ऊस गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू झालेला असून चालू गळीत हंगामात उत्पादीत झालेल्या पहिल्या 11 साखर पोत्यांचे पूजन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि अध्यक्ष सर्जेराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 

याप्रसंगी आ. शिवेंद्रसिहराजे म्हणाले कीं, केंद्रीय कृषीमुल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने सन 2017-18 च्या गाळप हंगामाकरिता जाहीर केलेल्या नोटीफिकेशनप्रमाणे आपल्या कारखान्याची एफआरपी प्रती मे.टन 2640 रुपये निघालेली आहे. प्रत्येक कारखान्याचा वेगवेगळा साखर उतारा असल्याने कोणता कारखाना किती दर देणार आणि कधी दर जाहीर करणार याकडे ऊस उत्पादक शेतक-यांचे लक्ष लागले आहे. 

यासंदर्भात आपल्या अजिंक्यतारा कारखान्याच्या संचालक मंडळाने काल झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार पहिली उचल म्हणून एफआरपी प्रती मे.टन 2640 रुपये आणि वाढीव रक्कम 360 रुपये जादा असे एकूण प्रती मे.टन 3000 रुपये (विनाकपात) प्रमाणे जाहीर केला आहे. 

अजिंक्यतारा कारखान्याचे ऊस गाळपाबरोबरच डिस्टीलरी व सहवीज निर्मिती हे पूरक प्रकल्पही पूर्ण क्षमतेने व यशस्वीपणे चालू असून सहवीज निर्मिती प्रकल्पाकडील उत्पादीत होत असलेल्या विजेपैकी पॉवर प्लँट व कारखाना वापर वजा जाता उर्वरीत वीज वीज वितरण कंपनीला निर्यात करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे चालू गाळप हंगामातही ऊस उत्पादकांच्या नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप नियोजनपुर्वक करण्यात येत असून ऊस पुरवठादारांनी गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी आपला नोंदलेला संपूर्ण ऊस आपल्याच अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे गाळपास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन आ. शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी केले. 

याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी गळीत हंगामाबाबत माहिती देताना सांगितले की, गाळपास आलेल्या 21,614.827 मे.टन ऊसाचे बिल विनाकपात एफआरपीनुसार प्रती मे.टन रू. 2640/- प्रमाणे 5 कोटी 70 लक्ष 63 हजार 129 रुपये आणि वाढीव रक्कम प्रती मे.टन रू.360/- प्रमाणे 77 लक्ष 81 हजार 352 असे एकूण प्रती मे.टन 3000 रुपये प्रमाणे अशी एकूण रक्कम रूपये 6 कोटी 48 लक्ष 44 हजार 481 संबंधीत शेतक-यांच्या संबंधीत बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.