Breaking News

कर्जमाफी न दिल्यास 1 डिसेंबरपासून राज्यभर आंदोलन - सुप्रिया सुळे

रत्नागिरी, दि. 17, नोव्हेंबर - येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारने शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही तर 1 डिसेंबरपासून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उग्र आंदोलन छेडील, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दापोली येथे दिला.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी व कोकणावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज दापोलीत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.


दापोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (केळसकर नाका) येथून सकाळी अकराच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या दरवाढीचा निषेध करत मोर्चास प्रारंभ झाला. या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा अनेक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. राज्यभरात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आत्महत्येचा देखावा, गॅस सिलिंडर्सच्या दरात करण्यात आलेल्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी ग ॅसच्या दोन भव्य प्रतिकृती तयार करून त्या मोर्चात सहभागी करण्यात आल्या होत्या.

मोर्चात तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांपासून वारकर्‍यांपर्यंत विविध समाजघटक सहभागी झाले होते. प्रत्येक मोर्चेकर्याच्या हातात भाजपा सरकारच्या निषेधाचे फलक आणि राष्ट्रवादीचा झेंडा होता. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव हे मोर्चात सहभागी झाले. 

सुप्रिया सुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्या बैलगाडीतून मोर्चात सहभागी झाल्या. मोर्चा बसस्थानक चौकात आल्यानंतर आमदार संजय कदम यांनी दापोली बसस्थानकात जाऊन बंद करण्यात आलेल्या गाड्या सुरू करण्याबाबतचे निवेदन आगार व्यवस्थापकांना दिले. त्यानंतर मच्छीमार्केटमार्गे मोर्चा बाजारपेठ, नटराज नाका, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरून तहसीलदार कार्यालयावर धडकला. 

तेथे खासदार सुप्रिया सुळे यांनी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे, तहसीलदार कल्पना जाधव यांना निवेदन दिले. जनतेच्या प्रश्‍नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून समस्या सोडवण्याचा सूचना प्रांताधिकार्यांना केली. यानंतर येथून मोर्चा पुन्हा डॉ. आंबेडकर चौकात गेल्यानंतर येथे आक्रोश सभा घेऊन मोर्चाची सांगता झाली. मोर्चात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व क ार्यकर्ते, पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत बैकर, उपसभापती राजेंद्र गुजर यांच्यासह महिलाही सहभागी झाल्या होत्या.
मोर्चा संपल्यानंतर केळसकर नाका येथे सभा झाली. 

त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपा-सेना सरकारवर कडाडून टीका केली. एसटीचा प्रश्‍न संपूर्ण राज्यात संवेदनशील असून जनसामान्यांशी निगडित असा प्रश्‍न आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेवर आले तर बुलेट ट्रेनचा निधी एसटीकडे वळवू,अशी ग्वाही त्यांनी दिली. जनतेचे अनेक प्रश्‍न असून कर्जमाफी तुटपुंजी झाली आहे. 

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पवार साहेबांनी देशाच्या शेतीसंदर्भात घेतलेले बहुसंख्य निर्णय या सरकारने बदलले असून आज कोणत्याही पिकाला हमीभाव मिळत नाही. गॅस सिलिंडर्सच्या भाववाढीमुळे गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आले आहे. महागाईमुळे हातातोंडाशी जुळवाजुळव होत नाही अशी परिस्थिती आहे. या संपूर्ण कारभाराला भाजपाचे सरकार कारणीभूत असून शिवसेनाही सरकारच्या या कारभाराला तितकीच जबाबदार आहे. शिवसेनेचे सैनिक हे कधी काळी वाघ होते. 

 आता त्यांची बकरी नव्हे तर मांजरच झाले आहे. ’मी लाभार्थी’च्या जाहिरातीत उद्धव ठाकरेंचा किंवा सेनेच्या एकाही मंत्र्याचा फोटो नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्यामध्ये राष्ट्रवादीचे सरकार येणे गरजेचे असून यासाठी आपण आत्तापासूनच कार्यरत व्हावे, असे आवाहन सुळे यांनी केले.