Breaking News

विविध क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत स्वीडनच्या पंतप्रधानांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई, दि. 12, ऑक्टोबर - स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान तसेच घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य वाढविण्याबाबत स्वीडनचे  पंतप्रधान स्टीफन लॉफवेन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळ स्वीडनच्या दोन दिवसीय दौर्‍यासाठी क ाल (दि. 11) स्टॉकहोम येथे पोहोचले. या शिष्टमंडळाने दौर्‍याच्या पहिल्या दिवशी विविध उद्योगसमूह तसेच मान्यवरांशी संवाद साधला. स्वीडीश उद्योगसमुहांना भारतात अधिकाधिक  गुंतवणूक करणे शक्य असलेल्या क्षेत्रांसह त्यासाठी महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती लॉफवेन यांना यावेळी देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योग मंत्री सुभाष  देसाई यावेळी उपस्थित होते.
राज्यात निर्माण होत असलेल्या स्मार्ट सिटी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि एकात्मिक सार्वजनिक वाहतूक प्रकल्प तसेच संरक्षण उत्पादन क्षेत्र आणि कौशल्य शिक्षणाच्या  क्षेत्रात भरीव कार्य करण्याची गरज इत्यादी विषयांवर या परिषदेत चर्चा झाली. केंद्रीय मंत्री श्री. प्रभू यांच्यासह दोन्ही देशातील आघाडीच्या उद्योगसमुहांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
स्कॅनिया समुहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मॅथियास कार्लबूम यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीत काम करणारा स्कॅनिया हा स्वीडनमधील सर्वांत मोठा उद्योगसमूह  आहे. नागपूर शहरात सध्या कार्यरत असलेल्या या समुहाने राज्यातील इतर शहरांमध्ये वाहतुकीसाठी बायोगॅस सुविधा क्षेत्रात काम करण्याची तयारी यावेळी दर्शविली. राज्यात याबाबतच्या  देखभाल सुविधा तसेच तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास देखील या समुहाने सहमती दर्शविली.