Breaking News

असूनी करोडोची माता,परी वांझ मी...

 लोकांनी लोकांसाठी चालवलेली कारभार पध्दती म्हणजे लोकशाही आपण स्वीकारली.जागतीकछछ पातळीवर तुलनात्मक विचार केला तर ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही आहे त्या प्रत्येक देशांशी स्पर्धा करतांना आपली लोकशाही फार लवचिक आहे.त्याहीपेक्षा आपण खुपच उदारपणे लोकशाही नांदवत असल्याचे गेल्या सत्तर वर्षात जाणवले.एका बाजूला सत्तेची दोर हातात असलेले राज्यकर्ते या लोकशाहीचा वापर विशिष्ट हेतू समोर ठेऊन उदारपणे करतांना दिसतात,या हेतूला ज्यांच्यासाठी लोकशाही जन्माला घातली गेली,ज्यांच्या जीवावर लोकशाही व्यवस्था जगते त्या करोडो  सामान्य जनतेला कुठलेच स्थान नाही.तरीही ही करोडो जनता तितक्याच उदारपणे त्यांचा तो हेतू स्वतःवर लादून घेण्याचा मोठेपणा दाखवते.लोकशाहीची ही शोकांतिका म्हणायची,चांगूलपणा म्हणायचा की राज्यकर्त्यांची  मुत्सद्दीगीरी ?हा प्रत्येकाच्या कुवतीचा भाग आहे.पण करोडोंची पोषणकर्ती असलेल्या भारतमातेचे रूदन माञ असह्य होऊ लागले आहे.
या देशाची आजची लोकसंख्या सव्वाशे करोड.मनुष्यबळाची,तंञकौशल्याची,नैसर्गीक साधन संपत्तीची तसूभरही उणिव नाही.उलट मायंदाळ आहे सारं.तरीही भारतमातेच्या लेकरांना कुठलेच समाधान मिळू दिले जात नाही.नैसर्गिक आपत्तीपासून खून दरोडे,दंगली,लुट, बलात्कार यासारख्या मानवी कृत्यांनी हैदोस मांडला आहे.हे कमी की काय म्हणून राज्यकते देखील आपला वाटा उचलत आहेत.सार्वजनिक मालमत्ता आपल्या बापाची जहागीर आहे अशा अविर्भावात देशाच्या मालमत्तेचा  स्वैर उपभोग ही मंडळी घेऊन जनहिताच्या मुद्यांवर पार्श्वभागाला हात पुसून मोकळी होत आहे.
हा देश स्वतंञ झाल्यापासून अनेक सरकारं आली गेली.नाव बदलली,प्रवृत्ती माञ सारखीच.जनसामान्यांच्या कष्टांवर तिजोरी भरायची आणि आप्तस्वकीय हितसंबंधीत,बडे उद्योगपती यांच्यावर उधळायची.हाच कार्यक्रम स्वातंञ मिळाल्यापासून हा स्तंभ वाचत असल्याच्या क्षणापर्यंत भारतवर्षात हेच सुरू आहे.लोकशाहीची बुज राखून देशहितासाठीअहोराञ खपणारी सामान्य माणसं,मध्यमवर्गीय,शेतकरी,शेतमजूर कामगार,छोटेछोटे व्यवसायिक यांच्या पदरात काय पडते तर महागाई.या महामागाईचे मुळ जिथं आहे ती धोरणं.
आजची परिस्थिती अत्यंत भयावह आहे.या परिस्थितीला विद्यमान सरकार जबाबदार तर आहेच पण ज्यांनी या धोरणांची बीजे पेरली त्या यापुर्वीच्या नालायक राज्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे.आज महागाईच्या मुळाशी असलेली इंधन दरवाढ हा कळीचा मुद्दा आहे.पाठोपाठ कर्जबाजारी शेतकर्यांची आत्महत्या,चलन तुटवड्यामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था आणि त्यातून उद्योगांची विशेषतः लघू उद्योगांची होणारी ससेहोलपट,कामगारांचे उध्वस्त होत असलेले संसार ,शेती उध्वस्त झाल्याने रस्त्यावर उपाशी पोट घेऊन भटकणारे शेतमजूर,हे सारे गंभीर प्रश्न ऐरणीवर असतांना आपले राज्यकर्ते या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी त्यांची थट्टा करण्यात आनंद मानीत आहेत.सामान्य जनतेचे अश्रू पुसण्याऐवजी धनदांडग्यांची दिवानखाने सजविणारे निर्ण घेण्याची प्रथा स्वातंञ्यांपासून सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे.जगभरात वस्तूचा भाव उत्पादन खर्च अधिक वितरण व्यवस्था यांचा हिशेब करून ठरविण्याची शास्रीय प्रथा रूढ असतांना भारताने माञ इंधन किंमत ठरवितांना प्रचलित प्रथेला फाटा देऊन उत्पादन खचाच्या चार पट अधिक किंमत वसूल करण्याची तुघलकी पध्दत स्वीकारली.या उलट शेतकरी शेतीला उद्योगाच्या नजरेने बघा,उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव द्या असे आर्जव करतो आहे.हे आर्जव बोळे घातलेल्या कानात शिरत नाही.हमी भाव तर दूरच,पण उत्पादन खर्चही भागू न शकणारा भाव शेतकर्याच्या तोंडावर मारला जातो.या दोन्ही उदाहरणात भाव निश्चितीची पध्दत एकच पण वसूलीची तर्हा माञ वेगळी.मनमानी लूट करणारी इंधन किंमत निश्चितीची पध्दत आणि दुसर्या बाजूला शेतमालाची बाजारात लूट करण्याचा दिलेला खूला परवाना ही दोन उदाहरण राज्यकर्त्यांची मानसिकता स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत.अर्थात या परिस्थितीला करोडो जनताचं कारणीभूत आहे.राज्यकर्त्यांना दोष देण्यात कुठलेच हशील नाही.भारत मातेवर क्षणोक्षणी होणारे अत्याचाराला भारतामातेचे सव्वाशे करोड नपूसक पुञ निर्लज्जपणे पहात आहेत.म्हणून भारतमाता अश्रू ढाळून टाहो फोडून जगाला सांगते आहेः असूनी करोडोची माता,परी वांझ मी!