Breaking News

पुणेरी पलटण पाटणा पायरेट्स संघाची आगेकूच

आज तिसर्‍या बाद फेरीत आमने-सामने 

मुंबई, दि. 24, ऑक्टोबर - अतिशय अतितटीच्या सामन्यात पुणेरी पलटणने यूपी योद्धाचा 40-38 असा पराभव करून निर्णायक क्षणी मिळवलेली पकड कायम ठेवली आणि  प्रो-कबड्डीतील पहिल्या एलिमिनेटरच्या सामन्यात विजय मिळवला. पाचव्या हंगामातील पहिला बाद फेरीचा सामना कमालीचा चुरशीचा झाला. सुरवातीच्या  पिछाडीनंतर पुण्याने दोन  गुणांच्या फरकाने मिळवलेला हा विजय निश्‍चितच नेत्रदीपक दाखवणारा होता.
यूपीचा हुकमी कोपरारक्षक सागर कृष्णाला झालेली दुखापत आणि अखेरच्या दोन मिनिटांत सामना जवळपास बरोबरीत असताना नितीन तोमर आणि रिशांक देवाडिगा बाद झाले  होते, त्यामुळे यूपीकडे चढाईसाठी भरवशाचा खेळाडू नव्हता. या संधीचा फायदा घेत पुण्याने निर्णायक घाव घातला. यूपीकडून रिशांक देवाडिगाचे नाणे खणखणीत वाजले. त्याने 15  गुणांची कमाई केली; परंतु मोक्याच्या क्षणी त्याच्या पकडी गिरीश एर्नाकने केल्या. त्याचाही फटका यूपीला बसला. रिशांक आणि मी भारत पेट्रोलियममधून खेळतो, त्यामुळे मला  त्याचा खेळ माहीत आहे असे गिरीशने सामन्यानंतर सांगितले.
यूपीच्या रिशांकच्या देवाडीगाने सामन्यात तब्बल 15 गुण मिळवून सुद्धा यूपीला पराभव स्विकारा लागला. पुण्याच्या अक्षय जाधवने युपीचा कर्णधार नितीन तोमरच्या दोन सुपर टॅकल  केल्या. मध्यांतराच्या 18-18 बरोबरीनंतर पुण्याने 33-24 अशी आघाडी घेतली, पण या वेळी कलाटणी देणारा खेळ यूपीने केला; मात्र दोन मिनिटांत रिशांक आणि तोमर मैदानात  नसल्याचा त्यांना फटका बसला. पुण्याकडून दीपक हुडाने 10, गिरीशने सात आणि अक्षयने सहा गुणांचे योगदान दिले.
दरम्यान गतविजेत्या पाटणाने हरियानाचा 69-30 असा पराभव करून आगेककूच केली. आता तिसर्‍या बाद फेरीत मंगळवारी रात्री  पुणेविरुद्ध पाटणा, असा सामना होईल. प्रदीप  नरवालने एकाच चढाईत सहा खेळाडू बाद, सामन्यात सर्वाधिक 34 गुणांचा विक्रम तसेच प्रदीपने पाचव्या मोसमात आतापर्यंत सर्वांधिक 308 गुण मिळवले.