Breaking News

तेजस एक्स्प्रेसला सेवा पुरविणार्‍या खानपान व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी, दि. 17, ऑक्टोबर - आलिशान तेजस एक्स्प्रेसमध्ये झालेल्या विषबाधाप्रकरणी चिपळूण पोलिसांनी मडगाव येथील खानपान व्यवस्थापक जे. जे. घोष यांच्या विरोधात  गुन्हा दाखल केला आहे. विषबाधा झालेल्या सर्वांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करताना काल 24 प्रवाशांनी टोमॅटोचा अंतर्भाव असलेले आम्लेट, सूप, कटलेट आदी पदार्थ खाल्ल्यानंतर उलटी आणि जुलाब सुरू झाले. रत्नागिरी ते  चिपळूण दरम्यान बाधा झालेल्या प्रवाशांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गाडी चिपळूण स्थानकात थांबविली. बाधा झालेल्या 24 प्रवाशांना  चिपळूणमधील रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी 18 जणांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना काल (दि. 15 ऑक्टोबर) रात्रीच रुग्णालयातून सोडण्यात आले. उलटी-जुलाबामुळे  शरीरातील पाणी कमी झाल्याने प्रकृती अधिक खालावलेल्या सहा प्रवाशांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रकृती स्थिर झालेल्या चार प्रवाशांना आज  सकाळी तर उर्वरित दोघांना दुपारी सोडण्यात आले. अन्नविषबाधा झालेल्या प्रवाशांची पुढील प्रवासाची व्यवस्थाही रेल्वेने केली होती. त्याप्रमाणे उपचारानंतर सर्व रुग्ण मुंबईकडे  रवाना झाले.
या प्रकरणी मालाड पूर्व येथे राहणारे मधुकर नारायण जाधव यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. मधुकर जाधव आपला मुलगा व सुनेबरोबर तेजस एक्स्प्रेसने मुंबईला चालले  होते. नाश्ता केल्यानंतर मुलगा नीलेश आणि सून निहारिका यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. इतरही 22 प्रवाशांना असेच मळमळू लागले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत  चालली, अशी तक्रार मधुकर जाधव यांनी दिली आहे. या तक्रारीवरून तेजस एक्स्प्रेसमधील खानपान व्यवस्थापक जे. जे. घोष (रा. मडगाव) यांच्या विरोधात चिपळूण पोलिसांनी  काल रात्री दोन वाजता गुन्हा दाखल केला आहे.