Breaking News

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागाचे सदस्यांकडून वाभाडे

नाशिक, दि. 04, ऑक्टोबर - आरोग्य केंद्रात औषधे नाही, अधिकारी मुख्यालयी थांबत नाही, भरारी पथके काम करत नाही, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून  कारवाई होत नाही, अशा तक्रारींची पाढा काल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी वाचला. जिल्ह्यातील वाढत्या तक्रारीवरून सदस्यांनी आरोग्य  विभागाचेच ऑडिट करण्याची मागणी यावेळी केली. 
जि.प. ची सर्वसाधारण सभा काल अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्षा नयना गावित, सभापती यतिंद्र पगार, मनिषा पवार, सुनीता  चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दी मीना, अति मुख्य कार्यकारीअधिकारी अनिल लांडगे उपस्थित होते.
सभेत आरोग्य विभागाच्या अशा गलथान कारभाराचा परिणाम म्हणून सदस्यांनी आरोग्य विभागाचा संवेदनशील भागात सेवा पुरविण्याचा कोटयवधीचा विषय फेटाळून  लावत आरोग्य विभागाला चपराक दिली.
सभेत आयत्या वेळच्या विषयात आरोग्य विभागातील औषध खरेदीला मान्यतेचा विषय ठेवण्यात आला. सदस्यांनी आरोग्याच्या कारभाराचे लक्तरे काढण्यास सुरूवात  केली. कोटयावधींची औषध खरेदी केली जाते मात्र, आरोग्य केंद्रांना वेळेत औषधे मिळत नाही. तोंड पाहून केंद्रांना औषधाचे वाटप केले जाते, बिबटया हल्यातील  जखमींना वेळेत लस देखील मिळत नाही, अधिकारी सदस्यांना जुमानत नाही, अनेक आरोग्य केंद्रातील अधिकारी मुख्यालयी थांबत नाहीत, अशा अनेक तक्रारींचा  पाऊसच सदस्यांनी यावेळी पाडला. इगतपुरी तालुकाआरोग्य अधिकार्‍यांकडून सदस्यांचा अपमान होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोपही झाला. या  चर्चेत संजय बनकर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, धनराज महाले, हरिदास लोहकरे, उदय जाधव, यशवंत ढिकले, कान्हुराज गायकवाड,अनिता बोडके, रूपाजंली माळेकर,  सिध्दार्थ वनारसे यांनी भाग घेतला.
कुपोषणावर चर्चा
धनश्री केदा आहेर व सिमंतिनी कोकाटे यांनी कुपोषण मुद्यावर जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना धारेवर धरत कुपोषणाने किती बालके दगावली अशी विचारणा केली.  त्यावर आरोग्य अधिकारी माहिती देतो असे सांगितले असता आहेर यांनी 250 बालके दगावली आहेत. त्यावर आरोग्य विभागाने काय कार्यवाही केली असे विचारले.  जिह्यात कुपोषण वाढत असताना आरोग्य विभाग झोपला आहे का ? असा सवाल कोकाटे यांनी केला. आरोग्य अधिकारी मृत्यू कुपोषणाने न झाल्याचा दावा करू  लागताच सभागृहाने कामात सुधारणा करा, चांगले काम करा असे सुनावले.