Breaking News

शरद पवार राजकारणातील सुसंस्कृत, संवेदनशील व्यक्तिमत्व - मुख्यमंत्री

अमरावती, दि. 24, ऑक्टोबर -  शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमट विला, असा दूरदृष्टीचा नेता घडायला मोठा कालावधी लागतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या संसदीय कार्याचा गौरव केला.  खासदार शरद पवार यांच्या संसदीय कार्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मैदानावर सर्वपक्षीय नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विकासासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन निर्णय घेणारे व्यक्तिमत्व श्री. पवार यांच्या रूपाने आज महाराष्ट्रात आहे. पक्षभेद विसरून ते राज्य आणि  देशाच्या विकासासाठी पाठिंबा देतात. राज्याच्या प्रगतीसाठी कोणते निर्णय घ्यावेत, याचे मार्गदर्शन श्री. पवार यांच्याकडून होत असते. राजकीय पक्षांमध्ये संवाद नाहीसा होतो,  अशावेळी त्यांच्यात संवाद घडवून आणू शकेल, असे ते एकमेव नेते आहेत. समृद्धी महामार्गासाठी शेतकर्‍यांना योग्य मोबदल्यासाठी त्यांनी आंदोलन केले. तथापि महामार्गाला विरोध  करू नका, असा सल्लाही शेतकर्‍यांना त्यांनी राज्यहितासाठी दिला. असा नेता प्रत्येक पक्षात असणे आवश्यक आहे.
श्री. पवार यांची शेतीशी असलेली निष्ठा त्यांनी स्वत:हून स्विकारलेल्या कृषी खात्याच्या तत्कालीन जबाबदारीतून दिसून येते. या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेती क्षेत्राला  दिशा मिळाली. राज्य फळबाग क्षेत्रात देशात अग्रेसर असण्याचे श्रेय त्यांनाच आहे. शेतीची उत्पादकता वाढावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. कृषी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा  गौरव संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान यावे, नवीन वाण यावे, यासाठी केलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना खासदार श्री. पवार म्हणाले, अमरावती शहराशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधामुळे येथील सत्कार हा जुन्या आठवणींना उजाळा देणारा आहे. संत गाडगे  महाराज, तुकडोजी महाराजांच्या सहवासामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडला. येथील भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शेती व शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मोठे कार्य केले.  त्यांच्या कार्यामुळे अमरावती हे शिक्षणाचे माहेरघर झाले आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचण्यास मदत झाली आहे. अशा भूमीत सन्मान  होणे भाग्याची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री श्री. पोटे-पाटील, खासदार श्री. अडसूळ, डॉ. राजेंद्र गवई, वसुधाताई देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात श्री. पवार यांच्या संसदीय कार्याचा गौरव म्हणून  मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.