Breaking News

कवठेमहांकाळात शेततळ्यात पडून बहिण- भावाचा मृत्यू

सांगली, दि. 19, ऑक्टोबर - कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे दोन चिमुरड्या बहिण- भावाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा  उघडकीस आली. या घटनेने आगळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अनुष्का सुनील बाबर (वय साडे तीन वर्षे) व समर्थ सुनील बाबर (वय दोन वर्षे) अशी या दोन दुर्देवी बहिण- भावाची नावे आहेत. ऐन दीपावली सणातच बाबर कुटुंबियांवर या  घटनेने मोठा आघात झाला आहे. आगळगाव गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असणार्या बाबर वस्तीवर ही घटना घडली.
सुनील बाबर यांचे आगळगाव गावच्या दक्षिणेला पाच किलोमीटर अंतरावर नांगोळे- लंगरपेठ रस्त्यालगत घर आहे. त्यांच्या घरात दीपावली सणानिमित्त फराळाचे साहित्य बन विण्याची लगबग सुरू असल्याने घरातील महिला त्या गडबडीत होत्या. अनुष्का व समर्थ ही भावंडे अन्य भावंडांसमवेत घराबाहेर मातीच्या बनवलेल्या किल्ल्याजवळ खेळत होती. ही  दोन भावंडे खेळता खेळता घराशेजारी असलेल्या शेततळ्याच्या काठावर गेली. त्याठिकाणी शेततळ्यातील प्लास्टिकच्या कागदावरून पाय घसरल्याने हे दोघेही पाण्यात पडले व  त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
बर्याच वेळानंतर मुले घरात न आल्याचे पाहून घरातील महिलांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. सर्वच ठिकाणी शोध घेऊनही मुले कोठेच दिसली नाहीत. अखेर काहीजणांनी  शेततळ्याकडे धाव घेऊन पाहिले असता त्यांना पाण्यात या दोन्हीही मुलांचे मृतदेह आढळून आले. हे पाहून आई- वडिलांसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. याबाबत रात्री उ शिरा कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.