Breaking News

महापालिका बसवणार सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशिन्स

पुणे, दि. 13, ऑक्टोबर - शहरात आणि उपनगरांत 35 वेगवेगळ्या ठिकाणी महापालिकेतर्फे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशिन्स उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी  दिली. एकात्मिक सायकल योजनेच्या निधीवर स्थायी समितीने तिसर्‍यांदा डल्ला मारला असून, त्यातील सुमारे पाच कोटी रुपये सॅनिटरी नॅपकिनच्या प्रकल्पासाठी वापरले जाणार  आहेत. शहरात दररोज सुमारे 1600 टन कचरा निर्माण होतो. त्यातील 2 टन सॅनिटरी नॅपकिन असतात. हा कचरा नष्ट करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही. शहरात 41 पैकी  6 प्रभागांत सध्या सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशिन्स आहेत. उर्वरित 35 प्रभागांतही प्रमुख ठिकाणी ही मशिन्स उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष  मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या मशिन्सची पुढील चार वर्षे महापालिकेतर्फेच देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.