Breaking News

भाऊसाहेब हिरेंच्या पुतळ्याचे अनावरण निसर्गानेच केले

नाशिक, दि. 08, ऑक्टोबर - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेससहकारी संस्थांचे संस्थापक ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाऊसाहेब हिरे यांचा जिल्हा बँकेच्या  प्रवेशद्वारावर अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुतळ्याचे अनावरण अखेर निसर्गानेच काल करून टाकले.
बँकेच्या प्रवेशद्वारावर आठ वर्षे कापडात गुंडाळलेला दिवंगत भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्याचे अनावरनास सहकार विभागाकडून ना हरकत दाखल्याची बँकेला प्रतीक्षा  होती.मात्र,कालच्या वादळी वार्‍यामुळे झाकलेल्या पुतळ्याचे कापडच उडून गेल्याने आठ वर्षे रखडलेले अनावरण घडले. यामुळे मानवी नियम, कायदे, संकेत यांना  निसर्गापुढे काही स्थान नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
राज्यात कुळकू करून भूमिहीनांना जमिनी देणारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि ग्रामीण शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आक्रमक  राजकारण केले. राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळातही ते महसूलमंत्री होते. तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह अनेक सहकारी संस्थांचे संस्थापक होते.  यामुळे जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा जिल्हा बँकेने निर्णय घेतला. त्यांचे पणतू अद्वय हिरे बँकेचे अध्यक्ष  असताना 2009 मध्ये बँकेच्या प्रवेशद्वारावर त्यांचा पुतळा बसविला. त्यासाठी आवश्यक परवानगी घ्यायचे मात्र राहून गेले. शासनाच्या नियमावलीनुसार पुतळ्यासाठी  सोळा परवानग्या आवश्यक असतात. बँकेने त्यापैकी 15 परवानग्या मिळवल्या आहेत. सहकार विभागाकडून ना हरकत दाखला मिळवण्यासाठी बँकेने दीड वर्षापूर्वी  परवानगी मागितली आहे. पण दाखला मिळत नसल्याने हा पुतळा कापडात बांधून ठेवावा लागत आहे.