Breaking News

जिल्हा बँकेच्या 21 कोटी स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार

नाशिक, दि. 28, ऑक्टोबर - नोटाबंदी झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या 341 कोटींपैकी रिझर्व्ह बँकेने 320 कोटी रुपये स्वीकारले मात्र उर्वरीत 21 कोटी रुपये  स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे वृत्त आहे. 21 कोटींच्या नोटा बदलून मिळणार नाही व कर्जमाफीचा घोळ सुरू असल्यामुळे जिल्हा बँकेसमोरील अडचणींमध्ये वाढ  झाली आहे.. 
जिल्हा बँकांकडे चलनातील जमा जुन्या नोटांपैकी हिशेब न जुळलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्या नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असतानाही  रिझर्व्ह बँकेने या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचे जिल्हा बँकांना कळविल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या 21 कोटींच्या नोटांचा भुर्दंड कोणावर टाकायचा, असा प्रश्‍न आहे.  8 नोव्हेंबर 2016 ला हजार व पाचशेच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर 10 ते 14 नोव्हेंबरपर्यंत नाशिक जिल्हा सहकारी बँकेत 342 कोटी रुपये जमा  झाल्याचे जिल्हा बँकेने जाहीर केले होते. त्यानंतर त्यात दुरुस्ती करून ती रक्कम 341 कोटी असल्याचे सांगण्यात आले. जुन्या नोटा स्वीकारताना जिल्हा बँकांनी घोळ  केल्याच्या तक्रारी गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास व बदलून देण्यास बंदी घातली. त्यानंतर जिल्हा बँकांकडून जुन्या चलनातील  नोटांचा हिशेब जुळत नसल्याचे कारण सांगून अनेक महिने नोटा स्वीकारण्यास नकार दिला. अखेर या नोटा स्वीकारण्याची तयारी दर्शविली, तरीही काही नोटांचा हिशेब  जुळत नसल्याचे कारण सांगून त्या स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 कोटींच्या नोटा तशाच पडून आहेत.
जिल्हा बँकेला 320 कोटी रुपये बदलून मिळाल्यानंतर ती रक्कम बँकेची तरलता व रोखतेचे प्रमाण राखण्यातच खर्ची झाल्यामुळे ठेवीदारांना देण्यासाठी जिल्हा बँकेकडे  रक्कम नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या ठेवीदारांकडून मोठा तगादा सुरू आहे. या 21 कोटींच्या जुन्या नोटा बदलून मिळाल्यानंतर व कर्जमाफीची रक्कम मिळाल्यानंतर  ठेवीदारांना रक्कम देण्याचे आश्‍वासन जिल्हा बँकेतर्फे सुरू आहे.