Breaking News

बृहन्मुंबई ललित कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या ‘सीईओ’पदी राजेंद्र पवार

मुंबई, दि. 22, सप्टेंबर - बृहन्मुंबई ललित कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यकारी व प्रशासकीय अधिकारीपदी राजेंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. आयुक्त अजॉय मेहता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विलास वैद्य यांच्या जागी राजेंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अंधेरी क्रीडा संकुल आणि मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह व तरण तलाव याचा कारभार बृहन्मुंबई ललित कला आणि क्रीडा प्रतिष्ठानतर्फे पाहिला जातो. या  कारभारात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार भाजपाचे स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि भाजप गटनेते मनोज कोटक यांनी आयुक्तांकडे केली होती. याचा  तपास करण्यासाठी आयुक्तांनी उपायुक्त राम धस आणि सुधीर नाईक यांची एक चौकशी समिती नेमली. या समितीकडून चौकशी सुरू असताना वैद्य यांनी पदावर  राहणे नैतिकतेला धरून नाही, असे सांगत त्यांच्या जागी नवीन अधिका-याची नियुक्ती करण्यात आली असल्याचे महापालिकेतील काही अधिका-यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर असतात, तर व्यवस्थापकीय विश्‍वस्तपदी सध्या आदेश बांदेकर विराजमान आहेत. मात्र आयुक्त मेहता यांनी यापैकी  कोणालाही विश्‍वासात न घेता वैद्य यांना पदावरून दूर केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा एक धक्का मानला जात आहे.