सुनिल तटकरेंवर आरोपपत्र दाखल
रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळा प्रकरण
मुंबई, दि. 12, सप्टेंबर - रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळ्यात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, या आरोपपत्रात माजी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते सुनील तटकरे यांच्या नावाचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) सत्र न्यायालयात सुमारे 3 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले.याघोटाळयात सहा अधिकार्यांच्या नावाचा देखील समावेश आहे. गेल्या वर्षी याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबीला आरोपपत्र दाखल करायला 1 वर्षांचा अवधी लागला. एफ. ए. एंटरप्रायझेस या कंत्राटदारामुळे राज्य सरकारला 90 कोटींचे नुकसान झाल्याचा ठपका देखील एसीबीने ठेवला आहे. 3 हजार पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्रात जवळपास 50 पेक्षा जास्त साक्षादारांची साक्ष या नोंदवण्यात आली. सुनील तटकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी एसीबी आणि ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. गेली अनेक वर्ष फक्त चौकशीच सुरू असून अद्याप कोणताही निष्कर्ष न निघाल्याने उच्च न्यायालयाने बुधवारी एसीबी आणि ईडीला चांगलेच खडसावले होते.
रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरण प्रकल्पाला कोकण पाटबंधारे विभागाने 19 मे 2011 रोजी मान्यता देण्यात आली होती. मात्र मान्यता देतांना तातडीने निविदा मागविण्यात आल्या होत्या. ही निविदा मागवत असतांना अटी-शर्तीकडे डोळेझाक केल्याचा ठपका यासंबधित सहा अधिकार्यांवर ठेवण्यात आला आहे.
दै. लोकमंथनकडून यापूर्वीच पर्दाफाश
प्रकल्पाच्या मूळ किंमतीत भरमसाट वाढ झाल्यानंतर या प्रकल्पाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. भाजप नेते विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यात भाजपची सत्ता आल्यास जलसिंचन घोटाळ्यातील सर्व दोषींना तुरुंगात धाडू, असे म्हटले होते. त्यामुळे भाजपने सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
कोंडाणे धरण प्रकल्पाच्या घोटाळयांची पोलखोल दैनिक लोकमंथनने यापूर्वींच आपल्या विशेष सदरात केली होती. यासंबधीचे पुरावे देखील दैनिक लोकमंथनने एसबीला सादर केले होते. सदर प्रकरणी एसीबीने दाखल केलेल्या आरोपत्रात एफ. ए. कन्स्ट्रक्शन आणि एफ. ए. एन्टरप्रायजेसचे निसार फतेह खत्री तसेच जलसंपदा विभाग व कोकण पाटबंधारे विकास विभागाचे देवेंद्र शिर्के, तत्कालीन कार्यकारी संचालक, बी.बी. पाटील तत्कालीन मुख्य अभियंता, पी.बी. सोनावणे, तत्कालीन मुख्य अभियंता, आर. डी. शिंदे, तत्कालीन अधीक्षक अभियंता, ए.पी.काळूखे, तत्कालीन कार्यकारी अभियंता, राजेश रिठे या अधिकार्यांचा समावेश आहे.