Breaking News

जात लपवून सोवळ्यातील स्वयंपाक केला म्हणून गुन्हा दाखल


पुणे,दि.8 : जात लपवून श्राद्ध विधीसाठी सोवळ्यातील स्वयंपाक केला म्हणून एका बाईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जातीपातीला मूठमाती देण्याच्या काळात एका बाईच्या विरोधात जात लपविल्याबद्दल एका सुशिक्षित महिलेने गुन्हा दाखल करावा याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
गौरी गणपती बसतात. घरी आई-वडिलांचे श्राद्ध विधीही असतात. त्यासाठी त्यांना ‘सोवळ्यातील’ स्वयंपाक करणारी सुवासिनी असलेली ब्राह्मण स्त्री हवी होती. 2016 मध्ये मे महिन्यात त्यांच्याकडे निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री आली होती. देवाच्या कार्यक्रमाचे स्वयंपाक करते असे सांगितले होते. तिच्या माहितीवरुन खोले यांनी प्रत्यक्ष धायरी येथील तिच्या घरी जाऊन चौकशी करून त्या ब्राह्मण आहेत की नाही याची खात्री केली. त्यानंतर लगेचच निर्मला यांना घरच्या धार्मिक कार्याच्या स्वयंपाकासाठी बोलावले. मे 2016 मध्ये वडिलांच्या श्राद्धाच्या वेळी, सप्टेंबर महिन्यात गौरी गणपती आणि खोले यांच्या आईच्या श्राद्धाच्यावेळी तसेच 2017 मध्ये वडिलांच्या श्राद्धासह अन्य धार्मिक कार्यक्रमात या महिलेने सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. दोन वर्षात त्यांनी एकूण सहा वेळा स्वयंपाक केला. दरम्यान, बुधवारी निर्मला या ब्राह्मण नसून मराठा असल्याचे खोले यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितले. याबाबत खोले यांनी पुन्हा निर्मला यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी निर्मला यांनी त्यांचे नाव निर्मला यादव असल्याचे सांगितले. त्यावेळी निर्मला यांना त्यांनी कुलकर्णी असे खोटे नाव का सांगितले, आमच्या घरी केवळा ब्राह्मण समाजातील सुवासिनी बाईने केलेलाच स्वयंपाक चालतो अशी विचारणा केली. यावरून निर्मला यांनी दमदाटी आणि शिवीगाळही केल्याची फिर्याद डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली आहे.याबाबत तक्रार करू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून तसेच समाजातील मान्यवरांकडून डॉ. खोले यांची समजूत घातली जात होती. मात्र, फिर्याद दाखल करून घेण्यावर त्या ठाम राहिल्या. अखेर पोलिसांना फसवणूक करणे, हल्ला करणे आणि धमकी देणे या कलमाखाली गुन्हा दाखल करून घ्यावा लागला.