Breaking News

अँबी व्हॅलीचा लिलाव थांबवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली, दि. 12, सप्टेंबर - सहारा समुहाला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. अँबी व्हॅलीचा लिलाव थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नकार दिला  आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी सहाराने आणखी वेळ मागितला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळली.
लिलावाची प्रक्रिया ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होईल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. शिवाय 966.80 कोटी रुपये जमा करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यासही  सुप्रीम कोर्टाने नकार दिला. 1500 कोटींपैकी 966.80 कोटी रुपये जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सुब्रतो रॉय यांनी केली होती. दरम्यान यापूर्वीही  सहारा समुहाने लिलाव थांबवण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने पैसे जमा केल्याशिवाय लिलाव थांबवला जाणार  नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोर्टाने सुब्रतो रॉय यांना ‘सहारा’ दिला नाही.  त्यामुळे अँबी व्हॅली सहाराच्या हातातून जाण्याची शक्यता  आहे.