Breaking News

विद्यापीठाचे वातावरण बिघडवाल तर तडीपार - पोलिस आयुक्त

औरंगाबाद, दि. 18, सप्टेंबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित आंदोलकांना तडीपार  करण्यात येईल, अशी भूमिका पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी  शनिवारी दुपारी यादव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विद्यापीठात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरून वाद सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी शिवजयंतीच्या कार्यक्रमात पुतळ्याची घोषणा केल्यानंतर  कुलगुरूंनी पुतळा उभारणीसाठी 40 लाख रुपयांची तरतूद केली. मात्र, विद्यापीठ परिसरात पुतळा उभारू नये अशी भूमिका काही आंबेडकरवादी संघटनांनी घेतली  आहे. तर पुतळा तातडीने उभारण्याची मागणी मराठा संघटनांनी केली आहे. या संघटनांचे आंदोलन तीव्र झाल्यानंतर विद्यापीठाचे कामकाज विस्कळीत झाले. दररोज  वेगवेगळ्या संघटनांची शिष्टमंडळे कुलगुरूंना घेराव घालत असल्यामुळे संरक्षण पुरवण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनाने पोलिस आयुक्तांना केली होती. त्यानुसार  विद्यापीठात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रमुख आंबेडकरवादी संघटनांनी पुतळ्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्यानंतर वाद निवळला आहे.  या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन आभार मानले. विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण खराब होऊ नये  म्हणून संरक्षणाची गरज होती. आंदोलनांमुळे विद्यार्थी व कर्मचारी वेठीस धरले गेले, अशी खंत चोपडे यांनी व्यक्त केली. तर विद्यापीठाचे शैक्षणिक वातावरण कलुषित  करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना तडीपार करण्यात येईल असे यादव यांनी सांगितले. आतापर्यंत शहरात दोनशेपेक्षा अधिक गुंडांवर तडीपारीची कारवाई केली आहे.  त्यामुळे कायद्याचा भंग करणार्‍यांवर कारवाई करू, असे यादव यांनी कुलगुरूंना सांगितले. पोलिसांच्या भूमिकेबद्दल चोपडे यांनी समाधान व्यक्त केले.