पर्यटन विकास महामंडळच्या वतीने स्वच्छ भारत अभियान
औरंगाबाद, दि. 18, सप्टेंबर - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे इतर शासकीय संस्थांच्या सहकार्याने दि. 16 ते दि. 30 सप्टेंबर 2017 या कालावधीत स्वच्छ भारत अभियान पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद यांनी कळविले आहे. या अभियानांतर्गत औरंगाबाद व परिसरातील विविध पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या अंतर्गत दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा. बिबी का मकबरा, दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. अजिंठा टि-पाँईट शॉपिंग प्लाझा व अजिंठा अभ्यागत केंद्र परिसर, दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा. वेरुळ लेणी परिसर, दि. 19 सप्टेंबर रोजी 9 वा. दौलताबाद किल्ला, दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. भद्रा मारोती संस्थान परिसर, खुलताबाद, दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. गजानन महाराज मंदिर या सर्व ठिकाणी संबंधित तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पर्यटन क्लबचे विद्यार्थी तसेच शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यामार्फत स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.