Breaking News

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जागतिक समुद्री दिनाचे आयोजन

नवी मुंबई, दि. 27, सप्टेंबर - जागतिक समुवसाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका व नॅशनल मॅरीटाइम डे सेलिब्रेशन (सेंट्रल) कमिटी यांच्या संयुक्त  विद्यमाने विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी येथे जहाजांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन व विद्यार्थ्यांसाठी सागरी अभ्यासक्रमाबद्दल माहितीपट यांचे दि. 26 व 27 सप्टेंबर,  2017 रोजी दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचा अभिनव उपक्रम पहिल्यांदाच  नवी मुंबई महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे.
त्याचे उद्घाटन नवी मुंबईचे प्रथम नागरिक महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. व संचालक जनरल  शिपींग श्रीम. मालिनी शंकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपिठावर उप महापौर श्री. अविनाश लाड, स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, ड - प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. संगीता बो-हाडे, आरोग्य  परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती श्रीम. उषा भोईर, नगरसेवक श्री. प्रकाश मोरे, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण, मुख्य जहाज सर्वेक्षक, भारत  सरकार श्री. सुरेश कुमार व उप नाविक अधिकारी कॅप्टन जयकुमार मुदुली आदी मान्यवर उपस्थित होते.
जहाजे, बंदरे व लोकांना जोडणे अशी या वर्षाची संकल्पना आहे. सदर दिवशी जहाजांची सुरक्षितता, समुद्री सुरक्षा, समुद्री पर्यावरण यांचे महत्व अधोरेखीत करणे हा  मुख्य उद्देश आहे. या ठिकाणी जहाजांच्या विविध प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यांची विस्तृतपणे माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना विविध सागरी  अभ्यासक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी माहितीपट दाखविण्यात आले व हस्तपत्रके व इतर साहित्याचे वाटप केले गेले.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी व नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. तरी अधिकाधिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.