Breaking News

जगण्याचा अर्थ पुस्तकामधूनच सापडतो - उत्तम कांबळे

नाशिक, दि. 27, सप्टेंबर - अविद्येमुळेच दुःख येते. हे दुःख गंरांनी नव्हे तर पुस्तक वाचनाने दूर होते. जगण्याचा अर्थ मला पुस्तकातूनच सापडला. मी खचलो  त्यावेळी पुस्तकांनीच उभारी दिली, माझे रक्षण केले. पुस्तक माणसाला चेहरा देते, स्वतःला वाचायला व व्यक्त करायला शिकवते. पुस्तक ही उर्जा केंद्रे आहेत. जग  शस्त्राने नव्हे तर शब्दाने बदलते. वाचनातूनच मी घडलो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे  यांनी केले.
पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्या डॉ. एस.  एस. घुमरे, ग्रंथपाल प्रा. ए. पी. मेहेंदळे, उपप्राचार्य डॉ. एस. वाय. माळोदे, एस. एस. केदार, डॉ. शरद बिन्नोर, प्रा. नारायण शिंदे, प्रा. वाय. आर. बस्ते, प्रा. एस.  डी. डहाळे, विकास मोरे उपस्थित होते. स्री भ्रूण हत्येवर विद्यार्थ्यांनी केलेल्या पोस्टर्स व ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन कांबळे यांच्याहस्ते झाले.
कांबळे म्हणाले की, जगण्याला कारण हवे असते. कारण गती देते, ध्येय ठरवते. हे कारण ज्यांच्याकडे नाही त्याचे आयुष्य प्राण्यासारखे आहे. चालण्याची इच्छा  असेल तर वाट सापडते. विद्यार्थीदशेत वक्तृत्व स्पर्धांची तयारी करताना माझे खूप वाचन झाले आणि त्यातूनच वाचनाची गोडी लागली. वाचन हे माझ्या जीवनाचा  अविभाज्य भाग झाले आहे. वाचनामुळेच मी आज चांगला लेखक होऊ शकलो. चांगले लिहिण्यासाठी चांगले वाचन आवश्यक आहे. लिहिण्यासाठी शब्दसाठा समृद्ध  असणे गरजेचे आहे आणि तो वाचनातूनच वृद्धिंगत होतो. शब्द घेऊन आपण जीवनाला दिशा देतो. शब्दच नसेल तर व्यक्त होता येत नाही. व्यक्त होणे ही निसर्गाची  सुंदर देणगी आहे. पुस्तक हे जीवन अनुभवाचे, प्रतिभेचे व ज्ञानाचे झरे आहेत. वाट उसनी घेतली तर अपघात होतात, हे पुस्तक शिकवते. वाचनामुळे भाषा, ज्ञान  समृद्ध होते. कल्पना विलास वाढतो. त्यामुळे फालतू वेळ न घालवता विद्यार्थ्यांनी वाचन केले तरच ते यशस्वी होतील.
प्राचार्य घुमरे यांनी प्रास्तविकात महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्तच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. डहाळे यांनी सूत्रसंचलन केले. मेहंदळे यांनी आभार  मानले.