Breaking News

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत साई समाधी शताब्दी सोहळ्याचा प्रारंभ

अहमदनगर, दि. 27, सप्टेंबर - येत्या रविवारी 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डीमधील लेंडीबागेत उभारण्यात आलेल्या 51 फूट  उंचीच्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करून साईबाबा जन्मशताब्दी सोहळ्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे.यावेळी राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे,गृहराज्यमंत्री रणजित पाटील,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासहीत अनेक मान्यवर उपस्थित राहाणार  असल्याची माहिती साई संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा शुभारंभ 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.त्यापूर्वी रविवारी सकाळी 6 वाजता सजविलेल्या  रथामधून साईबाबांची प्रतिमा व ध्वजस्तंभाच्या प्रतिकृतीची मिरवणुक काढण्यात येणार आहे.या मिरवणुकीत लेझिम पथक,ढोलपथका सहीत विविध देखावे सादर  करण्यात येणार असून भाविक देखील मोठ्या संख्येने सहभागी होतील.साई समाधी शताब्दी च्या कालावधीत शिर्डीमध्ये विविध प्रकारच्या मोफत आरोग्य शिबिरांचे  आयोजन केले जाणार असून त्यांचा शुभारंभ 1 ऑक्टोबर रोजी नेत्रदान शिबिराने केला जाणार आहे,असे अध्यक्ष डॉ.हावरे यांनी सांगितले.साई संस्थानचे उपाध्यक्ष  चंद्रशेखर कदम,विश्‍वस्त बिपीन कोल्हे,भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके,मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल आदि यावेळी उपस्थित होते.