Breaking News

’स्मार्ट केअर’ यंत्रणा; मिळकतकर भरा घरबसल्या


पुणे,दि.8 : महापालिकेचा मिळकत कर आता तुम्हाला घरबसल्या भरता येणार आहे. त्यासाठी कर संकलन विभागाने उभारलेली यंत्रणा अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात त्याची प्रायोगिक चाचणीदेखील घेतली जाणार आहे. त्यानंतर महिनाभरात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रशासनाने सुरू केलेल्या ’स्मार्ट केअर’ या तक्रार निवारण प्रकल्पाअंतर्गत ही सुविधा मिळणार असल्याच मिळकतकर विभागाने सांगितले आहे.जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटी बंद झाला आहे. त्या बदल्यात राज्यशासनाकडून महापालिकेस प्रत्येक महिन्यास अनुदान दिले जाते. मात्र, दैनंदिन उत्पन्नासाठी केवळ मिळकतकर हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यामुळे करसंकलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी मिळकतकर विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दोन वर्षांत पालिकेने अभय योजना राबविली होती. तर या वर्षी आता थेट करधारकांच्या घरी जाऊन कर वसूल करण्याची सुविधा पालिका देणार आहे. त्या अंतर्गत महापालिकेकडून स्मार्ट केअर या तक्रार निवारण प्रणालीच्या टोल-फ्री क्रमांकावर नोंदणी केल्यानंतर संबधित नागरिकाच्या घरी महापालिकेचे कर्मचारी कर संकलनासाठी जातीत. मात्र, त्यासाठी संबधित करदात्यास काही शुल्क जादा मोजावे लागणार आहे. त्यासाठी यंत्रणा मिळकतकर विभागाने उभारलेली असून त्याची चाचणी पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी चाचणीवेळी 10 जणांच्या घरी जाऊन करसंकलन केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.