Breaking News

सांबांतील भ्रष्ट युतीच्या सदोष मनुष्यवध कलमाच्या साखळीने मुसक्या बांधा

दि. 18, सप्टेंबर -  केंद्रीय रस्ते विकास मंञी नितीन गडकरी रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक असल्याची कबुली देतात.गेल्या वर्षभरातील रस्त्यांवर  पडलेल्या खड्यांमुळे झालेल्या अपघातात तब्बल अडीच हजार जणांचा बळी गेल्याची आकडेवारी मंञी महोदयांच्या निष्कर्षाला  गंभीर दुजोरा देते,यावरून अवघा  महाराष्ट्र खड्यात असून त्याचे उत्तरदायित्व सरकारने स्वीकारने क्रमप्राप्त ठरते.टोलमध्ये होणारे झोल,रस्त्याच्या कामात झालेला घोळ,सार्वजनिक बांधकाम खात्याच्या  कारभारात आलेले शैथिल्य,मंञालय आणि बांधकाम खाते यांच्यात असलेला सुसुञतेचा अभाव किंवा परस्परांमध्ये नको तितके जपले जात असलेले भ्रष्ट सामंजस्य  या बाबी या खड्यांच्या मुळाशी आहेत.म्हणूनच या अपघातांना जबाबदार धरून त्या प्रत्येक दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा....
काही दिवसापुर्वी देशाचे रस्ते विकास मंञी यांनी एक सुचक विधान गेले.महाराष्ट्र रस्ते अपघातात तिसर्या क्रमांकावर आहे. देशाची रस्ते बांधणी करणारे, रस्ते  बांधणीचा सखोल अभ्यास असणारे नितीन गडकरी यांच्या सारखे मंञी जेंव्हा हा निष्कर्ष समोर ठेवतात तेंव्हा वस्तुस्थितीवर शंका घ्यायला फट सापडत नाही.
केंद्रीय मंञ्यांच्या या निष्कर्ष वक्तव्यापाठोपाठ महाराष्ट्रातील रस्ते अपघातातील मृतांची संख्या तब्बल अडीच हजारावर पोहचल्याची आकडेवारी या क्षेञात अभ्यासपुर्ण  काम करणार्या जाणकारांनी जाहीर गेली.अडीच हजार नागरीकांचा बळी घेणारे बहुसंख्य अपघात रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे होत असल्याचा निष्कर्ष  जाणकारांनी परिश्रमपुर्वक  केलेल्या अभ्यासातून काढला आहे.या निष्कर्षाला सार्वजनिक बांधकाम मंञालयासह  सार्वजनिक बांधकाम प्रशासनातील तज्ञांनीही दुजोरा  दिला आहे.
ज्या विभुतींच्या कुकर्माने रस्त्यांवर खड्डे पडले, या खड्यांमुळे शेकडो अपघात झाले, त्या खड्यांत अडीच हजार बळी गेले ते मान्यवर खड्यांविषयीची वस्तुस्थिती  मान्य करतात, प्रत्यक्षपणे जबाबदारी स्वीकारत नसले तरी अडीच हजार बळींची जबाबदारी त्यांची आहे हे ते अप्रत्यक्षपणे मान्य करतात. याचाच अर्थ अडीच हजार  नागरिकांचे ते एका वेगळ्या अर्थाने खुनी आहेत. मग या अपघाताला कारणीभूत धरून अडीच हजार बळींची  जबाबदाररी त्यांच्यावर निश्‍चित करायला हवी.आणि  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या मंडळींवर दाखल करायला हवा.
या चांडाळ चौकडीत सार्वजनिक बांधकाम मंञी चंद्रकांत पाटील यांचा थेट संबंध किती आणि कसा आहे हा एसआयटीच्या संशोधनाचा विषय असला तरी मंञी  म्हणून त्यांची जबाबदारी ओळखण्यात त्यांना येत असलेले अपयश त्यांना सहजपणे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करते.एक सार्वजनिक बांधकाम मंञी बेजबाबदारपणे  वागला तर काय होऊ शकते हा इतिहास नव्हे तर वर्तमान आहे.
सार्वजनिक बांधकाम मंञ्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध स्पष्ट होईल, पण तत्पूर्वी त्या त्या विभागातील सार्वजनिक बांधकामचे मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता,  कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, गुणवत्ता पथक, स्थापत्य अधिकारी कर्मचारी आणि संबंधित रस्त्याचे कंञाटदार यांची साखळी जबाबदार ठरवून  या सर्वांच्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली मुसक्या आवळणे काळाची गरज आहे.