Breaking News

विकासाचे बुलेट स्वप्न...

दि. 18, सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी आणि बहूचचर्चित मुंबई- अहमदाबाद या बुलेट टे्रनच्या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. मात्र  देशात बुलेट ट्रेन येत असल्यामुळे पुन्हा एकदा बुलेट ट्रेन देशात येण्याची ही वेळ योग्य की अयोग्य? यात गुजरातचा फायदा होणार की मुंबईचा? गुजरातमधये येऊ  घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या टप्प्यावर उद्घाटन करत पंतप्रधान मोदी यांनी अचूक वेळ साधली असे अनेक प्रश्‍नांचा उहापोह यानिमित्ताने होत आहे.  विकासाचे दिवास्वप्नाला वास्तवांची जोड देणे सुध्दा आवश्यक आहे. जपान आज विकासाच्या अढळ अशा स्थानावर विराजमान आहे, मात्र जपानमध्ये बुलेट ट्रेन  वास्तव्यात आली 1964 साली. दळणवळणांच्या सुविधा मजबूत केल्यामुळे जपानने सर्वच क्षेत्रात मोठी झेप विकासाच्या क्षेत्रात आपली आगेकूच कायम राहिली. मात्र  आज बुलेट ट्रेनचा उपयोग कोण करणार? किती लोकसंख्या करणार ? यातून देशाच्या विकासात किती भर पडणार या सर्व प्रश्‍नांची चर्चा करण्याची खरी गरज  आहे. एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. जपानकडून 0.01 टक्के व्याजदराने 50 वर्षांसाठी 88 हजार कोटीचे कर्ज आपण या प्रकल्पासाठी  घेतले. मात्र आजमितीस भारतीय रेल्वेची अवस्था काय आहे? भारतीय रेल्वेचा दर्जा खालावत चालला असतांना बुलेट टे्रन सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून  आपण दिवाळखोरीत तर जात नाही ना? हाही महत्वाचा प्रश्‍न आहे. बुलेट टे्रनने पुढील काळात प्रवास करणांरा वर्ग हा व्यापारी वर्ग आहे. तो कोणत्याही सोयीसुविधा  स्वपैशाने घेऊ शकतो, इतका तो श्रीमंत असतांना तो विमानाद्ारे प्रवास करून आपला वेळ भरून काढू शकतो. असे असतांना 1 लाख 8 हजार कोटींची गुंतवणूक  अनेक कल्याणकारी योजनेवर खर्च करता आली असती. मात्र युती सरकारच्या काळात कल्याणकारी योजनांवर कात्री लावत तो निधी इतरत्र खर्च करण्यात येत  आहे. शिवाय जर बुलेट टे्रनचा पल्ला हा लांब असता, म्हणजेच किमान हजार बाराशे किलोमीटरचा तर बुलेट टे्रन ही देशाला परवडणारी असती. मुंबई- अहमदाबाद  या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल. 508 किमीच्या प्रवासांसाठी बुलेट टे्रन आणून त्यावर एक लाख कोटी रूपये आपण खर्च करणार आहोत. हा पैसा एका  विशिष्ट वर्गांचा नसून, देशातील प्रत्येक व्यक्तींचा आहे. असे असतांना बुलेट टे्रनचे दिवास्वप्न कशासाठी. मुंबई- अहमदाबाद या 508 किमी अंतरातील 156  किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे. या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत. वांद्रे, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा,  सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्टेशन्स ताशी 350 किमी धावण्याची क्षमता. अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी  सध्या 7 ते 8 तास लागतात. बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल. मात्र यामुळे मुंबईतील अनेक उद्योगधंदे गुजरातला  स्थलांतरित होऊ शकतात. तसेच अनेक व्यापारी गुजरातला स्थायिक होऊ शकतात. गुजरात आणि मुंबई या दोन ठिकाणाला विकसित करण्याचा यामागचा उद्देश  नक्कीच नाही. तर यातून व्यवसायवृध्दी आणि तेही गुजरातचे हा यामागचा महत्वाचा उद्देश आहे. पुणे- मुंबई- अहमदाबाद असा देखील बुलेट ट्रेनचा मार्ग ठेवता आला  असता. मात्र याचा महाराष्ट्राला जास्तीत जास्त फायदा नको, असेच या मार्गांतून दिसून येते. एकीकडे विकासाचे इमले बांधत असतांना सर्वसामान्यांचे काय असा प्रश्‍न  आता उपस्थित केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी असतांना देशांतर्गत मिळणारे पेट्रोल-डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत आहे.  एकीकडे विकासाचे बुलेट स्वप्न दाखवत असतांना, सर्वसामान्यांना अच्छे दिन आले का? हा महत्वाचा मुद्दा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला किमान मूलभूत  सुविधा वाजवी किमतीत मिळाव्यात ही माफक अपेक्षा असते. मात्र या मूलभूत सोयीसुविधांना फाटा देत विकासाचे बुलेट स्वप्न रंगवण्यात येत आहे. तेच मुळी चुकीचे  आहे. देशातील 50 टक्कांपेक्षा अधिक लोकसंख्या आज कोणत्या दर्जाचे जीणे जगते याचा शोध घेण्याची गरज आहे. कुपोषणासारखी समस्या आजही आपली पाठ  सोडत नाही, ही बुलेट स्वप्नातील दरी आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. सर्वसमावेशक राजकारणांची देशाला प्रामुख्याने गरज आहे. देशातील प्रत्येक नागरिक  स्वयंपूर्ण कसा होईल, यादृष्टीने उपाययोजना करणे सरकारचे प्रमुख कर्तव्य. एकीकडे महागाईच्या चटक्याने सर्वसामन्य होरपळत आहे. पेट्रोल, सह जीवनावश्यक  वस्तूंच्या किमती मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, भारताच्या विकासाचे स्वप्न रंगवण्यात येत आहे. दळणवळणांच्या सुविधांमुळे विकासाला  गती मिळते, मात्र आज देशांतील रेल्वेची काय अवस्था आहे, रस्ते खड्डेमुक्त कधी होणार? यासारखी ओरड सातत्याने होत असतांना, आपण त्याकडे कायमच दुर्लक्ष  करून, विकासाचे बुलेट स्वप्न दाखवत आहे. ज्याची तीव्रता सध्यातरी इतक्या मोठया प्रमाणावर नाही. मात्र बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे उद्घाटन झालेच आहे. त्यामुळे  त्याला आता रोखता येणे शक्य नाही. असे असतांना कल्याणकारी योजनांकडेसुध्दा दुर्लक्ष करणे विद्यमान सरकारला परवडणारे नाही, हे नक्की.