Breaking News

राष्ट्रवादाच्या नावावर धर्मांभिमान जोपासणारे

दि. 12, सप्टेंबर - देशाप्रती स्वयंस्फूर्तेने बांधीलकी जपणारे आणि त्याच बांधीलकीला धर्मांचा बुरखा घालून नंगानाच घालणार्‍यांची आणि लादू पाहणार्‍यांची संख्या  आजमितीस वाढत चालली आहे. देशभरात देशाभिमानाचे पीक जोरात आले असून, राष्ट्रवाद आता मागे पडत असल्यासारखेच चित्र आजमितीस तरी दिसत आहे.  ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी करण्याचे उद्योग पध्दतशीरपणे सुरू आहे. डॉ. दाभोळकर, क्रॉमेड पानसरे,  यांच्यानंतर कलबुर्गी यांच्या हत्या या ठरावकि अंतराने आणि त्यांनी आपले विचार मांड नये, फोफावू नये, यासाठी त्यांना संपविण्याचा डाव मांडला. कारण त्यांनी एक  लोकचळवळ उभारली होती, जी सर्वसामान्य जनतेला धर्मांच्या नावाखाली लुबाडणार्‍या विरूद्ध होती. ज्यामुळे त्यांना सातत्याने धोका वाटत होता की, आपली  दुकानदारी कायमची संपू शकते. त्यामुळेच या विघातक शक्तींकडून राष्ट्रवाद, देशाभिमान धर्मांशी जोडून, इतरांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न पध्दतशीरपणे सुरू आहे. 
देशभिमानाच्या नावाखाली सर्वच गोष्टी खपविण्याचा चंगच काही विघातक प्रवृत्तीने सुरू केला आहे. वास्तविक देशाभिमान ही स्वयंस्फुर्तेतून आली पाहिजे. त्यासाठी  राष्ट्रवाद जोपासण्याची खरी गरज आहे. मात्र आपल्याकडे प्रखर राष्ट्रवाद पूर्वीही नव्हता आणि आता ही नाही. काही लोक धर्माचे नाव जोडून राष्ट्रवाद शिकवू पाहत  आहे. देशातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून, सत्ताधार्‍यांना देशप्रेमाचे डोहाळे लागले आहे. त्यामुळे रोज एक नवीन वाद उकरून काढायचा आणि देशभक्तीचे  प्रमाणपत्र आपणच द्याचे असा रिवाजच इथल्या तथाकथित लोकांनी पाडला आहे. कधी नव्हे ते पुन्हा एकदा देशप्रेम म्हणजे नक्की काय हो? असा प्रश्‍न  सर्वसामान्यांना आता पडू लागला आहे. या देशातील नागरिक संविधानाप्रती बांधील आहे, असे असतांना तुम्ही विशिष्ट विचारसरणीचे देशप्रेम कसे लादू शकतात.  सामाजिक वातावरण गढूळ करण्यास अनेक जण आपली विदवत्ता पाजळत पुढे सरसावले आहेत. कोणत्याही देशात लोकशाही सक्षमपणे रुजण्यासाठी खर्‍या अर्थाने  गरज आहे ती मानवाला मुक्तपणे आपले स्वातंत्र उपभोगता आले पाहिजे. मात्र आजमितीस त्या मुक्त स्वातंत्र्याला कुठेतरी एक प्रकारची बाधा निर्माण होवू लागली  आहे. येथील प्रत्येक माणसाला आपले हक्क, अधिकार मुक्तपणे उपभोगता आले पाहिजे. मात्र या अधिकारावरच कुठेतरी गदा येत आहे. आजमितीस देशातील  वातावरण बघितले की, आपण कोणत्या मार्गाने चाललो आहोत, आणि शासनकर्ते त्याला कोणत्या मार्गाने घेवून जात आहे, हे दिसून येते. देशात सध्या अराजकता  वाढत असतांना त्याची दखल घेण्याऐवढे साधे सौजन्य सत्ताधार्‍यांनी दाखवू नये ? यासारखी दुसरी नामुष्की नाही. धर्मनिरपेक्ष वातावरणाला तिलांजली देत, धार्मिक  वातावरण दूषित करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. जिथे जिथे सामाजिक सांस्कृतीक चळवळ ताकदीने उभी आहे, तिथे तिथे समाज अधिक डोळसपणे निधर्मी  पायावर उभा असल्याचे जाणवते. त्यामुळेच विरोध वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. सांस्कृतीक चळवळीमध्ये समाविष्ट झालेला माणूस हा आपल्या जातीचा अथवा  धर्माचा मुखवटा घरामध्ये ठेवूनच बाहेर पडतो. अन्यथा त्याला सांस्कृतिक चळवळीचा अभिन्न अंग बनून वावरता येणारच नाही. संविधान, आणि आजचे राजकीय  वातावरण यात कुठेतरी लोकशाहीला, संविधानाला हरताळ फासण्याचे काम पध्दतशीरपणे सुरू आहे. आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाप्रती किती बांधील आहे याला  महत्व आहे.हीच बाब हेरून त्याच्यावर एका विशिष्ट विचारसरणी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे, आणि त्या विचारसरणीला त्याने नकार दिला तर त्याच्यावर  देशद्रोहाचा शिक्का मारण्यास सत्ताधारी उतावीळ झाली आहे. वैचारिकता हरवून बसलेले, राजकारणातील खिलाडूवृत्ती गहाण ठेवलेल्याकडून तरी काय अपेक्षा  करायची? मात्र इथल्या सर्वसामान्य नागरिकाला  त्याच्या जीविताची, स्वरक्षणाची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, आपले स्वातंत्र मुक्तपणे उपभोगता येईल यांची शाश्‍वती  हवी आहे? अन्यथा हा रोष,चीड रौद्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की !