Breaking News

मिरज- पंढरपूर रस्त्यावरील सहा स्टोन क्रशर सील

सांगली, दि. 18, सप्टेंबर - विनापरवानगी दगड उत्खनन करून त्याची खडी व क्रश सँड तयार करणारे मिरज तालुक्यातील सहा स्टोन क्रशर मिरज विभागाचे  तहसिलदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाने सील केले आहेत. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई  करण्यात आली आहे.
मिरज- पंढरपूर रस्त्यावर काहीजण विनापरवानगी दगड उत्खनन करून त्याची खडी व क्रश सँड तयार करीत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती.  एकीकडे तहसिल कार्यालयाकडे परवानगीसाठी नाममात्र अर्ज करायचा, तर दुसरीकडे राज्य शासनाचा महसूल बुडवून बेकायदा दगड उत्खनन केले जात होते. या  बेसुमार दगड उत्खननामुळे आसपासच्या द्राक्षबागा उदध्वस्त होतानाच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नष्ट होण्याची वेळ आली होती.
याबाबत नागरिक व शेतकर्यांकडून अनेकदा तक्रारी होऊनही केवळ राजकीय टगेगिरीमुळे हे दगड उत्खनन करणारे कायद्यातील पळवाटेतून सुटत होते. राजकीय  ताकदीच्या जोरावर काहीजण तलाठी अथवा मंडल अधिकारी यांना दगड खाणीच्या आसपासही ङ्गिरकू देत नव्हते. अशा परिस्थितीत शरद पाटील यांनी तलाठी व  मंडल अधिकारी यांचे महसूल पथक तयार करून या खाणी व त्यांच्या परवानगीची पाहणी करण्याचा आदेश दिला होता.
या पाहणीत या रस्त्यावरील सहा खाण मालकांकडे खुदाईचा परवाना नसतानाही ते बिनदिक्कतपणे सुरूंग लावून दगडाचे उत्खनन सुरू होते. याच दगडाची खडी व  वाळू बनविण्याचे कामही विनापरवानगीच सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने शरद पाटील यांनी हे सर्व सहा स्टोन क्रशर तातडीने सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे  स्टोन क्रशर सील करण्यात आले आहेत. आता या सर्वांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून या दंडाची वसुली झाल्यानंतरच  त्यांना दगड उत्खननास परवानगी दिली जाणार असल्याचे शरद पाटील यांनी सांगितले.