Breaking News

शिक्षकांचा ऑनलाईन कामावर बहिष्कार

सांगली, दि. 18, सप्टेंबर - शिक्षकांवर ऑनलाईन कामांचा वाढता बोजा पडत असल्याने अध्यापनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे शिक्षक कोणत्याही  प्रकारची ऑनलाईन कामे करणार नाहीत, असे शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले. 
या शिष्टमंडळाने सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन या आशयाचे निवेदन दिले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिक्षक  भारती संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश शरनाथे व सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी केले.
जिल्हा परिषदेकडील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते विविध उपक्रमही राबवित आहेत. त्यातून माहिती तंत्रज्ञानाचा  वापर कसा करता येईल, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिक्षक तंत्रस्नेही असल्याचा गैरङ्गायदा घेऊन त्यांच्याकडे अनेकदा ऑनलाईन कामांची जबाबदारी दिली  जात आहे. शिक्षकांवर मानसिक व शारिरीक ताण निर्माण होत आहे व वर्ग अध्यापनावर परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. वास्तविक, राज्य  शासनाने या ऑनलाईन कामांसाठी कोणतीही ठोस तरतूद केलेली नाही.
आज अनेक शाळांत इंटरनेट सुविधाही नाही, तर अनेक शाळेत नेटवर्क मिळत नाही. त्यामुळेही अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन कामांचे व्यापक स्वरूप लक्षात  घेऊन राज्य शासनाने या कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणावी. शिक्षकांना दिले जाणारे आदेश व्हॉटसअपवर न देता लेखी अथवा तोंडी द्यावेत. प्रगत  शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमातर्ंगत पायाभूत चाचणीसाठी पटसंख्येनुसार प्रश्‍नपत्रिका व शिक्षक मार्गदर्शिका पुरवाव्यात. शालेय पोषण आहारात सध्या स्थानिक पातळीवर  धान्य व माल खरेदीचे आदेश दिले आहेत. त्यातून मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढणार असून त्याला विरोध असल्याचेही शिक्षक भारती संघटनेने स्पष्ट केले आहे.