Breaking News

सातारा हिल मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या 61 वर्षीय राठींनी मिळवला दुसरा क्रमांक

नाशिक, दि. 18, सप्टेंबर - आज (दि. 17) झालेल्या सातारा हिल मॅरेथॉन मध्ये नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशनचे सदस्य असलेले 61 वर्षीय अ‍ॅडव्होकेट दिलीप  मदनलाल राठी यांनी सुपर वेटेरन गटात दुसरा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी अनवाणी पायांनी केवळ 2 तास 6 मिनिटात 21 किमीची अर्ध मॅरेथॉन  पूर्ण केली आहे. याद्वारे त्यांनी फिटनेसच्या बाबतीत आजच्या तरुणाईसाठी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
सातारा हिल मॅरेथॉनचे संचालक डॉ. संदीप काटे यांच्या हस्ते अ‍ॅड. दिलीप राठी यांना गौरविण्यात आले. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती  होती.
अ‍ॅड. राठी यांनी आजपर्यंत देश विदेशातील 50 हुन अधिक मॅरेथॉन धावल्या असून त्यांनी सायकलिंग मध्येही नाशिक ते गोवा, दिल्ली ते मुंबई अशा मोहीम फत्ते  केल्या आहेत. त्याचप्रमाणे अ‍ॅड. राठी हे उत्कृष्ट गिर्यारोहक आहेत. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प, रुपकुंड ट्रेक, कांचन जुंगा ट्रेक, अन्नपूर्णा ट्रेक, कैलास मानसरोवर ट्रेक,  ओमपर्वत ट्रेक असे नानाविध अवघड असे ट्रेक पूर्ण केले आहेत. गिर्यारोहण, सायकलिंग, धावणे यातून फिटनेस राखला तर त्याचा फायदा नक्कीच होतो असे ते  तरुणांना नेहमीच सांगत असतात.
सातारा मॅरेथॉनचे हे पाचवे वर्ष असून नाशिक सायकलीस्ट्सच्या सदस्यांनी सलग तिसर्‍या वर्षी विविध गटांत सहभागी होत यशस्वीपणे अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली आहे.  यात अ‍ॅड. वैभव शेटे, डॉ. मनीषा रौंदळ, साकेत भावसार, डॉ. निलेश निकम, मनोज शिंदे, नारायण वाघ, अतुल संगमनेरकर, डॉ. सुदर्शन मलसाने, आदींसह  नाशिक सायकलीस्टच्या 20 हून अधिक सदस्यांनी सातारा हिल मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवला. नाशिक जिल्ह्यातील विविध मॅरेथॉन स्पर्धा गाजवितानाच महाराष्ट्रासह  भारतातील इतर राज्यातीलही स्पर्धा नाशिक सायकलिस्ट्स गाजवत आहेत.