Breaking News

अडीच महिन्यात पेट्रोलच्या दरात 16 रुपयांनी वाढ!

मुंबई, दि. 11, सप्टेंबर - पेट्रोलच्या वाढत्या दरांनी वाहनचांलकांचा संताप अनावर झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असल्यामुळे ही वाढ एकदाच दिसून येत नाही. मात्र गेल्या अडीच महिन्यात पेट्रोलचे दर तब्बल 16 रुपये प्रती लिटरने वाढले आहेत. 1 जुलै 2017 रोजी पेट्रोलचा दर 63 रुपये लिटर होता आणि 10 सप्टेबर 2017 रोजी पेट्रोलचा दर 79 रुपये लिटर आहे. म्हणजे गेल्या 72 दिवसात पेट्रोलमध्ये 16 रुपयांची दरवाढ झाली आहे.
कधीकाळी 1 दोन रुपये जरी पेट्रोल वाढले, तरी वाहनचालकांच्या असंतोषाला कंठ फुटायचा. आता तर अडीच महिन्यात पेट्रोलने 16 रुपयांची विक्रमी उसळी घेतली आहे. तरीही सगळे चिडीचुप आहेत. त्यामागे रोजच्या रोज बदलणारे पेट्रोलचे दर कारणीभूत आहेत. 1 जुलै रोजी पेट्रोलचा दर 63 रुपये प्रती लिटर होता. तर 15 जुलै रोजी 65 रुपये, 1 ऑगस्टला 67 रुपये, 15 ऑगस्टला 70 रुपये, 1 सप्टेंबरला 75 रुपये आणि 10 सप्टेंबरला 79 रुपये प्रती लिटर आहे.
यालाच अच्छे दिन म्हणायचं का? पण नक्की ही दरवाढ होतेय का? याला आंतरराष्ट्रीय कारणे आहेत? की रोजच्या रोज इंधनाचे दर बदलण्याच्या नियमाआड ग्राहकांची शुद्ध फसवणूक होत आहे? असे एक ना अनेक प्रश्‍न वाहनचालकांच्या मनात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांमध्येही कायम इंधनाचा मुद्दा असायचा. पण सत्ता आली आणि इंधन हा सत्ताधार्‍यांसाठी मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे लोकांना आता पेट्रोलच्या आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं वाटत आहे.