Breaking News

विद्यापीठ नामांतरासाठी संघटना आता रस्त्यावर

सोलापूर, दि. 28, ऑगस्ट - सोलापूर विद्यापीठास आपापल्या समाजधुरिणांच्या नावाचा आग्रह धरत समाज संघटना आता रस्त्यावर येत आहेत. अहिल्यादेवी  होळकर यांचे नाव देण्यासाठी धनगर समाजाची मागणी आहे. त्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. दुसरीकडे  सिद्धेश्‍वर किंवा बसवेश्‍वर यांचे नाव देण्यासाठी लिंगायत समाज आग्रही असून, त्यासाठी शिवा संघटनेतर्फे 11 सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे.  विद्यापीठालाकोणते नाव द्यायचे यावरून विविध मागणी प्रस्ताव सोलापूर विद्यापीठासह शासनाकडे दाखल झालेले आहेत. तब्बल 28 पेक्षा जास्त अशा वेगवेगळ्या  नावांचे प्रस्ताव विद्यापीठाला 2004 पासूनच प्राप्त होत आहेत. त्यामुळे नेमके कुणाचे नाव द्यायचे, असा मोठा पेच विद्यापीठ आणि सरकारपुढे आहे. मोर्चा, आंदोलन,  मागणी करीत विविध संघटना आपापले नाव राजकीय लाभ लक्षात घेत, अस्मितेचे कारण पुढे करीत आहेत. मात्र सोलापूर विद्यापीठाने 2008 -09 मध्ये ठराव  करीत सोलापूर विद्यापीठ हेच नाव योग्य असल्याचे शासनाला ठरावाद्वारे कळवले. 2015 मध्ये जेव्हा प्रश्‍न चर्चेला आला तेव्हाही व्यवस्थापन समितीने पुनर्विलोकन  करीत सिनेट ठराव कायम ठेवला. हा प्रश्‍न पुन्हा चर्चेला आला, तेव्हा सिनेट ठरावाची माहिती शासनाला कळवण्यात आली.