Breaking News

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक - शाईस्ता अंबर

नवी दिल्ली, दि. 23, ऑगस्ट - तोंडी तलाक प्रथेवर बंदी आणण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक आहे. हा निर्णय म्हणजे केवळ देशातील  मुस्लिम महिलांची जीत नाही, तर इस्लामची जीत असल्याच्या भावना अखिल भारतीय मुस्लिम महिला वैयक्तिक कायदे मंडळाच्या अध्यक्षा शाईस्ता अंबर  यांनी व्यक्त केली आहे. 
मुस्लिम वैयक्तीक कायदे मंडळाचे सदस्य मौलाना मेहफूज यांनी सांगितले की, मुस्लिमांच्या कायद्यांमध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. सध्याच्या  संसद सदस्य चांगले नसून ते मुस्लिमांचे भले करू शकत नाहीत. तोंडी तलाकची प्रथा योग्यच आहे आणि ती कुणालाही बदलता येणार नाही.  औरंगाबादमधील मुस्लिम महिलांमध्येही या निर्णयाबाबत नाराजीचा सूर आहे. देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेने शरीयत कायद्यात हस्तक्षेप करण्यापेक्षा अन्य  महत्त्वाच्या समस्याकडे लक्ष द्यावे असे या महिलांचे म्हणणे आहे.
असे असले तरी काही प्रमुख मुस्लिम नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यसभा खा. हुसैन दलवाई यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ही प्रथा  मुस्लिम समाजातील महिल्यांसाठी अन्यायकारक होती. म्हणूनच ही प्रथा बंद पाडावी यासाठी 51 वर्षांपूर्वी आपले बंधू हमीद दलवाई यांनी मुंबई  विधानभवनावर 11 एप्रिल 1966 साली मोर्चा काढला होता. या मोर्च्यात माझ्यासह अन्य कुटुंबिय ही सहभागी झाले होते. या मोर्चानंतर मुस्लिम  धर्मगुरूंकडून धमकी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी या आंदोलनात सहभागी झालेल्या मुस्लिम महिलांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची  भेट घेऊन त्यांना आपला विरोध दर्शवणारे निवेदन दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही तोंडी तलाक प्रथेवरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या साठी कठोर कायदा बनवणे व त्याची  तितक्याच कठोरतेने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे हैदर आझम यांनी  भायखळ्यातील मुस्लिम महिलांसह एकत्र येऊन या निर्णयाचे स्वागत केले.