Breaking News

वाद्यांच्या गजरात मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना

पुणे, दि. 26, ऑगस्ट - आसमंतात घुमणारा ढोल-ताशांचा आवाज, सनई-चौघडा आणि तुतारीच्या ललकारी, ’गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा  घोषणांमध्ये शहरातील मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाची मोठ्या उत्साहात शुक्रवारी सकाळी प्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी पाचही मानाच्या गणपतींच्या  मूर्तींची दरवर्षाप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या चांदिच्या पालखीची मिरवणूक सकाळी 9 वाजता कसबा पेठेतील मंदिरापासून काढण्यात आली. मिरवणुकीवेळी ढोल-ताशांचा  आवाज आणि सनई-चौघड्यांमुळे परिसर दुमदुमला होता. भाविकभक्तांच्या अलोट गर्दीतून वाट काढीत ही मिरवणूक शनिवार पेठेतील लोखंडे तालमीजवळ पोहचली.  तेथून सकाळी साडेदहाच्या सुमारास पालखीमध्ये गणेशाची मूर्ती घेऊन ही मिरवणूक मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली. ही मिरवणूक अप्पा बळवंत चौक, फरासखाना  पोलीस ठाण्यासमोरून शिवाजी रस्त्याने मंदिराकडे गेली. मिरवणुकीमध्ये देवळणकर बंधुंचे नगारावादन आणि शिवतेज श्रीराम ढोल ताशा पथक तसेच प्रभात बँड आदी  वाद्यवृदांचा समावेश होता. प्रभात बँडने सादर केलेल्या गणरायांच्या गितांनी परिसर भक्तीभावाने फुलला होता. यंदा पहिल्यांदाच नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे  पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. कसबा पेठेतील सभामंडपात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. सांगलीचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते सकाळी  साडेअकराच्या सुमारास श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राहुल गुरुजी यांनी पौरोहित्य करत मंत्रोच्चार आणि गणपती स्तोत्र पठण केले.
मानाच्या दुसर्या तांबडी जोगेश्‍वरी मंडळाच्या गणपतीची सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात चांदीच्या पालखीतून मिरवणूक  काढण्यात आली. ही मिरवणूक नारायण पेठ, केळकर रस्ता, कुंटे चौक, लक्ष्मी रस्त्यावरून गणपती चौक मार्गे जोगेश्‍वरी सभामंडपात आली. मिरवणुकीमध्ये आढाव  बंधू यांचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड आणि शिवमुद्रा ताल ढोल-ताशा पथकांचे वादन झाले. पूजेचा मान व्यावसायिक समीर शाह यांना देण्यात आला. ‘श्री’ची  प्रतिष्ठापना दुपारी दीड वाजता करण्यात आली.