Breaking News

ब्ल्यू व्हेल : दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

नवी दिल्ली, दि. 23, ऑगस्ट - ऑनलाइन ब्ल्यू व्हेल गेमवर बंदी घालण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने फेसबुक, गूगल, याहू या समाज माध्यमांसह केंद्र  सरकारला नोटीस बजावली. न्यायालयाने समाज माध्यमांसह केंद्र सरकारकडून या प्रकरणी अहवाल मागवला आहे. पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी  होणार असून न्यायालयाने उत्तर देण्याचे आदेशही दिले आहेत. 11 ऑगस्ट रोजी फेसबुक, गूगल आणि याहूला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती केंद्र  सरकारने आज न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान दिली.
ऑनलाईन ब्लू व्हेल गेममुळे लहान मुले आत्महत्या करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारने या गेमसंबंधित सर्व लिंक हटविण्याचे आदेश सर्व  समाज माध्यमांना दिले होते. तसेच महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी गृह मंत्री राजनाथ सिंग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद  यांना पत्र पाठवून या गेमसंबंधित सर्व लिंक हटविण्याची विनंती केली होती.