Breaking News

सार्वजनिक वाहतुकीस प्रथम प्राधान्य द्या -केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पुणे विभागातील विविध कामांचा  कोनशिला अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे, दि. 28, ऑगस्ट - देशासह राज्यात वाढत जाणार्‍या वाहन संख्येमुळे होणारी वाहतुक कोंडी थांबवायची असेल तर सार्वजनिक वाहतुकीस प्रथम प्राधान्य द्या,  असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, महामार्ग व जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  येथे केले.
पाषाण रोड, मराठा मंदीर येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने बांधण्यात येणार्‍या राष्ट्रीय महामार्ग  4 (नवीन राष्ट्रीय महामार्ग 48) वरील चांदणी चौक येथील पूल व निगडीत कामे आणि सौंदर्यीकरण, खेड-सिन्नर (पुणे सेक्शन) येथील राष्ट्रीय महामार्ग 50(नवीन  राष्ट्रीय महामार्ग 60) वरील 5 बाह्यावळण मार्गाचा कोनशिला अनावरण समारंभ श्री. गडकरींच्या हस्ते पार पडला. तसेच खेड-सिन्नर (पुणे सेक्शन) येथील राष्ट्रीय  महामार्ग50 (नवीन राष्ट्रीय महामार्ग 60) वरील पूर्ण झालेल्या चार पदरी महामार्गाचा लोकार्पण सोहळा जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. या  कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार  सर्वश्री अमर साबळे, अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील,  श्रीरंग बारणे,  आ. भिमराव तापकीर, आ.श्रीमती मेधा कुलकर्णी, आ. श्रीमती माधुरी मिसाळ,  आ. जगदीश मुळीक,आ.योगेश टिळेकर, बाळा भेगडे, आ. बाबुराव पाचारणे, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महापालिकेचे आयुक्त कुणाल  कुमार, महापालिका पदाधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. नितीन गडकरी म्हणाले, पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीकोणातून चांदणी चौकात होणारा पूल हा महत्वाचा ठरणार आहे. सुमारे 600 कोटी रुपये खर्च करुन मुंबई  आयआयटी यांच्या सहाय्याने दीर्घकाळ टीकेल असा हा पुल बांधण्यात येणार आहे. सध्या देशासह राज्यात वाहतूक समस्या वाढत चालली आहे. वाहनांची संख्या  मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे  नागरिकांनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करावा, असे त्यांनी आवाहन केले. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा  वापर केल्यास वाहतूक कोंडीस आळा बसेल व देशाच्या महसूलात देखील वाढ होईल. नागरिकांनी रेल्वेमार्ग व जलमार्गाचा अवलंब करावा, असेही मत त्यांनी यावेळी  व्यक्त केले. शहरातील मुळा-मुठा नद्यांचा वाहतूकीस उपयोग करुन घेण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरि मदत करण्यास तयार आहे.  तसेच पुणे जिल्ह्यासह विभागात  सुरु असलेल्या कामांना गती देवून  ती योग्य वेळेत पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. येणार्‍या काळात  योग्य नियोजन करुन रस्त्याचे कामे करावीत  अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.  विमानतळाचा भार कमी करण्यासाठी शहरातील तळ्यांमध्ये पाण्यावर उतरणार्‍या विमानांचा उपयोग करुन वायु वाहतुकीच्या  पायलट प्रोजेक्ट मध्ये पुण्याचा समावेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.