धर्मसंस्थेतील पुरोगामी आणि प्रतिगामी!
दि. 07, ऑगस्ट - हिंदु बहुजन जातींना आजपर्यंत अज्ञानाच्या अंधारात खितपत ठेवण्यासाठी ब्राह्मण समुदायाने सर्वात मोठा आधार घेतला तो धर्म संस्थेचा. धर्म हा माणसासाठी आवश्यक आहे. मात्र यात माणूस धर्मासाठी नव्हे तर धर्म माणसासाठी असतो. धर्माच्या आधारे समाजाची धारणा होते. त्यामुळे मानवी समाज जीवनात धर्म हा मोठी भूमिका बजावत असतो. मात्र धर्माचे नियंत्रण ज्यांच्या हाती असते, ते त्या धर्मातील वंचितांना वेगवेगळ्या प्रकारे शोषणाच्या जोखडाखाली आणत असतात. साधारणत: धर्मसंस्था ही सुरुवातीच्या काळात पुरोगामी व्यवस्था मानली गेली. याचे महत्त्वाचे कारण निसर्गात आणि विश्वात होणार्या वेगवेगळ्या घडामोडी या केवळ जादूमुळे होतात असा प्राचिन मानव समाजाचा विश्वास होता. धर्माने मात्र प्रथमच पृथ्वी, चंद्र, सुर्य, तारे यांचे वेगवेगळे घटनाक्रम एका तत्वज्ञानाच्या साच्यात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सुर्योदय-सुर्यास्त, चंद्रोदय-चंद्रास्त यासह दिवस-रात्र या सर्व घडामोडींमागे जादू नव्हे तर एक विशिष्ट शक्ती असल्याचा सिध्दांत सर्व प्रथम धर्मानेच आणला. या सिध्दांताला किंवा धर्माने प्रचारित केलेल्या सिध्दांताला कोणी विरोध केला किंवा तो सिध्दांत चुकीचे निर्दशनास आणेल तर त्या धर्म संस्थेची कर्मठ व्यवस्था अशा लोकांना दंड देवू लागली तेव्हा धर्माने प्रतिगामी स्वरुप घेतले. त्यामुळेच कोपर्निकस सारख्या शास्त्रज्ञाने पृथ्वी भोवती सुर्य फिरत नसुन पृथ्वीच सुर्याभोवती फिरते असा सिध्दांत जेव्हा मांडला तेव्हा जगातल्या धर्माच्या ठेकेदारांनी त्या शास्त्रज्ञाला फासावर लटकविण्याचेचे फर्मान सोडले. तेव्हापासुन जगातल्या जवळपास सर्वच धर्मांनी आपले प्रतिगामी स्वरुप प्रकट करण्यास सुरुवात केली. युरोपसारख्या आजच्या विकसित झालेल्या देशांमध्ये धर्माचा आधार घेवून लोकांना पापामुक्तीचे आकर्षण दाखवून आर्थिक लुट सुरु केली होती. मार्टिन ल्युथरसारख्या जागतिक किर्तीच्या नेत्याने या व्यवस्थेला आव्हान दिले होते. त्यातूनच युरोपमधील आजची विकसित अवस्था दिसून येते. परंतु भारतीय समाज व्यवस्थेत धर्माचे स्वरुप ब्राह्मणी समुदायाने एवढे किचकट करुन ठेवले आहेत, की धर्मात ब्राह्मणेत्तर व्यक्तींना ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही. एवढेच नव्हे तर राज्यकर्त्यांचा राज्याभिषेक हा धर्माच्या प्रमुखांच्यामते नव्हे तर ब्राह्मणांच्याचमते ठरत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला. त्यावेळी उत्तर भारतात गागाभट्ट सारख्या पुरोहिताला आर्थिक आमिष दाखवून आणण्यात आले. हा इतिहास आम्हाला ज्ञात असला तरी धर्मसंस्थांमध्ये आमच्या मताला किंमत नाही. कारण धर्मसंस्थेचे सगळे अधिकार केवळ ब्राह्मणजाती समुहाकडे एकवटले आहेत. त्यामुळेच हिंदु धर्माच्या चार पिठांपैकी चारही पिठांचे शंकराचार्य हे जातीने ब्राह्मण आहेत. हिंदु धर्मातील इतर कोणत्याही जातीचा माणूस आजपावेतो शंकराचार्य का होवू शकला नाही? याचा जर आपण ऐतिहासिक संदर्भ शोधला तर शंबुकाच्या इतिहासापर्यंत आपल्याला मागे जावे लागेल. अध्यात्मिक ज्ञान आपल्या तपश्चर्येच्या जोरावर संपादन करणारा शंबुक हा अध्यात्माचा सर्वोच्च बिंदु होवू नये म्हणून ब्राह्मणांनी रामकरवी त्याचा खून करवीला. अशा या व्यवस्थेत आज आम्ही आधुनिक समाज व्यवस्थेत प्रवेश करुनही विज्ञानवादी दृष्टीकोन स्विकारण्यास तयार नाहीत याचा अर्थ आमची बौध्दिक घडण पूर्णपणे ब्राह्मणांच्या अधिन आहे. आज जर पाश्चिमात्य जगाकडे आपण पाहिले तर ख्रिश्चन धर्म जगात लोकसंख्येने मोठा असुनही प्रगत आणि विज्ञानवादी विचारांच्या आधारे पुढे जात आहे. तरीही त्या धर्माचे प्रमुख त्या-त्या देशातील राज्यसत्ता, आर्थिकसत्ता आणि सामाजिकसत्ता यात हस्तक्षेप करीत नाहीत. परिणामी धर्म आणि माणूस यांचा संबंध चार भिंतींच्या आत असलेल्या श्रध्देशीच संबंधित राहातो. चार भिंतींच्या बाहेर कोणतीही व्यक्ती विज्ञान आणि कायदा या नुसारच आपले जीवन व्यतीत करते. धर्म संस्थेवर ज्यांचे नियंत्रण असते त्यांना मानव जीवनाच्या विनाशा विषयी वाईट वाटतेच असे आढळून येत नाही. म्हणूनच दुसर्या महायुध्दात सजीव माणसांच्या रक्ताचे पाट वाहात असतांनाही कोणत्याही धर्माच्या प्रमुखांनी दुसरे महायुध्द संपुष्टात आणण्याचे आव्हान केले नाही. म्हणून आम्हाला हिंदु बहुजन समाजाला धर्माचे पालन करतांना त्या धर्माचे काही नियम आम्हीही बनवू शकतो या आत्मविश्वासाने वावरायला हवे. अन्यथा आमच्या धार्मिक आस्थांचा गैर फायदा घेत ब्राह्मण समुदाय आमच्याच विरोधातली बीजे पेरत राहील !