Breaking News

नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेमुळे दहा जखमींना जीवदान

रत्नागिरी, दि. 26, ऑगस्ट - नाणीज (ता. रत्नागिरी) येथील नरेंद्राचार्य महाराज संस्थानने अपघातग्रस्तांसाठीची सुरू केलेली मोफत रुग्णवाहिका सेवा गेली आठ  वर्षे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. राज्यातील 6 महामार्गांवर 27 रुग्णवाहिका सध्या कार्यरत आहेत. या सेवेमुळे आतापर्यंत विविध भागात झालेल्या अपघातातील 9553  जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. नरेंद्राचार्यजी महाराजांनी प्रवासादरम्यान काही अपघात व जखमींचे हाल पाहिले व त्यातून त्यांना ही कल्पना सुचली.  सध्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातूने महामार्ग रस्ते खराब व अपुरे आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढते आहे. अनेकवेळा अपघातातील जखमींची  कोणी विचारपूस करीत नाही. अपघात झाला की तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले तर उपचार लगेच सुरू होतात व त्यांचे प्राण वाचू शकतात. हे ओळखून  नरेंद्राचार्य महाराजांनी मोफत रुग्णवाहिका सेवेचा उपक्रम सुरू केला आहे. गेली आठ वर्षे राज्यातील मुंवई-गोवा, मुंबई- अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद, मुंबई-आग्रा,  पुणे-बंगलोर अशा पाच महामार्गांवर 27 रुग्णवाहिका दिवसरात्र, 24 तास कार्यरत आहेत. या रुग्णवाहिकांच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत एकूण 4271 अपघात झाले  आहेत. त्यातील जखमी 9553 जणांना या रुग्णवाहिकांनी तातडीने रुग्णालयात पोहोचवले आहे. त्यांच्यावर लगेच उपचार होऊन त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली  आहे. केवळ वेळेवर मदत न मिळाल्याने अनेक जखमी रुग्ण पोलिस येईपर्यंत जाग्यावरच विव्हळत असतात, तर काहींना वेळेत उपचार न झाल्याने तेथेच प्राण सोडावे  लागतात. अशा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मोफत व ठोस कार्य करण्याच्या जाणिवेतून स्वामींनी या रुग्णवाहिका सुरू केल्या. रात्री, अपरात्री अपघात झाला की  वाहन मिळत नाही. जखमींना दवाखान्यात कसे न्यायचे, हा प्रश्‍न पडतो. त्यातून या रुग्णवाहिका सेवेचा जन्म झाला. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात  नेता यावे, त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू व्हावेत, म्हणून संस्थानतर्फे महाराष्ट्राच्या हद्दीत हा मोफत रुग्णवाहिका उपक‘म राबविण्यात येत आहे. महामार्ग,  त्यावरील अपघातांची संख्या आणि रुग्णालयात पोहोचवलेल्या जखमींची संख्या अशी - मुंबई-गोवा महामार्गावर 1433 अपघातांतील 3270 जखमी,  मुंबई-हैदराबाद महामार्गावर 683 अपघातात 1421 जखमी, मुंबई-आग्रा महामार्गावर 1267 अपघातांतील 2919 जखमी, पुणे-बंगलोर महामार्गावर 243  अपघातात 248 जखमी आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 656 अपघातांतील 1695 जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. ही सेवा पूर्णतः मोफत आहे.  गाडीचा इंधन डिझेल व चालकाच्या पगाराचा खर्च संस्थानतर्फे दिला जातो. या रुग्णांकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून कसलेही पैसे घेतले जात नाहीत. अतिशय  तत्परतेने हे काम चालते. कोणत्याही अपघातस्थळी संस्थानची रुग्णवाहिका सर्वात प्रथम पोहोचते. काहीवेळा तर जवळच्या दोन्ही गावांतील संस्थानच्या रुग्णवाहिकेला  निरोप मिळतात. मग दोन्हीही रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होतात. त्यांचा जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी उपयोग होतो. सर्व महामार्गांवरील  रुग्णवाहिकांशी संपर्क साधण्याकरिता 8888263030 हा मोबाइल क्रमांक उपलब्ध आहे. त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.