Breaking News

सिनेमाचं तिकीट स्वस्त होणार, जीएसटीतील 66 वस्तूंच्या करात कपात

नवी दिल्ली, दि. 12 - जीएसटी परिषदेने झालेल्या बैठकीत 66 वस्तूंवरच्या करात बदल करून ते कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः शेतीसाठी लागणार्‍या ट्रॅक्टरच्या सुट्ट्या भागांवरील कर 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात संगणक प्रिंटरवर 28 ऐवजी 18, काजूवर 18 ऐवजी 12, इन्सुलिनवर 12 ऐवजी 5 टक्के कर आकारण्यात येणार आहे. दरम्यान देशभरात गाजत असलेला सॅनिटरी नॅपकिनच्या करात मात्र कपात करण्यात आलेली नाही.
100 रुपयांवरील सर्व सिनेमा तिकिटांवर 28 टक्के, तर 100 रुपयांखालील तिकिटांवर 18 टक्के कर लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी सर्व प्रकारच्या तिकिटांवर समान कर ठेवण्यात आला होता. सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक भाषेतील सिनेमांना करातून सवलत देण्यात आलेली आहे. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर ही पद्धत बंद होईल. मात्र राज्य सरकारची इच्छा असेल तर सबसिडी दिली जाऊ शकते. मात्र त्याने फार फायदा होणार नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 100 रुपयांच्या आत सिनेमाचं तिकीट असेल तर ते स्वस्तात मिळेल.