Breaking News

सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाला शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार

रत्नागिरी, दि. 28 - जालगाव (ता. दापोली) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाला सामाजिक व न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणार्‍या शाहू, फुले,  आंबेडकर पुरस्काराने नुकतेच कोल्हापूर येथे गौरविण्यात आले. राज्यातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या, वंचितांच्या न्यायासाठी झटणार्‍या संस्थांना सामाजिक न्याय  आणि विशेष सहाय्य विभागाकडून शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात  कार्य करणार्‍या 125 व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने कोल्हापूर येथील केशवराज भोसले नाट्यगृहात नुकतेच गौरविण्यात आले. महसूल  मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. यावर्षी राज्यातून सहा संस्थांना या  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये कोकणातील जालगाव (ता. दापोली) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ या एकमेव संस्थेचा समावेश होता.  संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष श्रीराम इदाते व कार्यवाह प्रा. सतीश शेठ यांनी हा पुरस्कार स्वीकरला. रोख 15 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप  आहे.