Breaking News

टीम इंडियाच्या नव्या जर्सीला स्वदेशी जागरण मंचचा विरोध!

मुंबई, दि. 05 -‘ओप्पो’ ही मोबाईल उत्पादक कंपनी टीम इंडियाचा नवा पुरस्कर्ता झाली आहे. भारतीय संघाच्या नव्या जर्सीचं अनावरणही करण्यात आलं. पण आता याच जर्सीला आरएसएसशी निगडीत एका संघटनेनं विरोध केला आहे. क्रीडा मंत्रालयाने यामध्ये हस्तक्षेप करुन ही ओप्पो आणि बीसीसीआयचा करार संपुष्टात आणावा अशी मागणी स्वदेशी जागरण मंचने केली आहे. ओप्पो ही चीनी कंपनी असल्यानं या संघटनेनं जर्सीला विरोध केला आहे.
स्वदेशी वस्तूंचे उत्पादन आणि वापर याच्या अभियानासाठी स्वदेशी जागरण मंचाने अभियान सुरु केलं आहे. त्यासाठीच या जर्सीला त्यांनी विरोध केला आहे. या  संघटनेकडून केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांना एक पत्र लिहण्यात आलं आहे. ‘राष्ट्राभिमान आणि आपल्या नागरिकांचे उद्योगांचे कल्याण यापेक्षा पैसा  महत्वाचा नाही. यासाठी आम्ही तुम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करुन ओप्पो आणि बीसीसीआयमधील करार संपुष्टात आणण्याची मागणी करत आहोत. ‘भारतीय  क्रिकेट संघातील खेळाडूंनी ओप्पो लिहलेली जर्सी घालू नये’ अशी मागणी या संघटनेचे राष्ट्रीय सहसंयोजक अश्‍वनी महाजन यांनी केली आहे.