Breaking News

तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण

सांगली, दि. 24 - तूर, मोसंबी, मिरची आणि आता हळदीच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ झाल्यामुळे, आता हळदीचे दरही घसरले आहेत. सांगलीच्या  बाजारपेठेत गेल्यावेळ पेक्षा 2 हजार रुपये कमी दर मिळत असल्यानं, हळद उत्पादक शेतकर्‍यांची निराशा झाली आहे. सांगलीची हळदीची बाजारपेठ देशात प्रसिद्ध  आहे. इथं होणार्‍या सौद्यातील दरावर देशातील बाजारपेठेत हळदीचे दर अवलंबून असतात. पण यंदा बाजारपेठेत हळदीची अवक वाढल्यानं, दर मात्र कमालीचे  घसरले आहेत. यंदा क्विंटल मागे 2 हजार रुपयाची हळदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत आहे.
मार्च अखेर सात हजार  ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल असणारा, दर यंदा आता पाच हजार ते दहा हजार प्रति क्विंटल झाला आहे. देशातच हळदीचं विक्रमी  उत्पादन झाल्यानं हळदीचे दर घसरल्याचं सांगली जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहर सारडा यांचं म्हणणं आहे. देशात दरवर्षी हळदीचं उत्पादन 62 ते  63 लाख पोती होतं. पण यंदा 80 ते 85 लाख पोत्याचं उत्पादन झालं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सन 2015-16 या आर्थिक वर्षात सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 7.70 लाख क्विंटल हळदीची आवक झाली होती. तर गेल्या वर्षी 2016-17  मध्ये  6.97 लाख क्विंटल हळदीची आवक झाली. पण यंदा10 लाख पोती म्हणजे साधारणपणे 8 ते साडे आठ लाख क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे यंदाचा सरासरी  दर 7 ते साडे सात हजार रुपये क्विंटल या दराने हळदीचे सौदे होत आहेत.