Breaking News

ताडोबातील रानतळोधी गावात भीषण आग, 37 घरं खाक

चंद्रपूर, दि. 24 - चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी गावाला लागलेल्या आगीत तब्बल 37 घरं जळून राख झाली आहेत. एका  किराणा दुकानाशेजारी असलेल्या वीजेच्या खांबला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दुकानाला लागलेली आग पुढे प्रचंड वाढत गेली. यामुळे अनेक घरं जळून खाक  झाली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या आगीत 11 गोठेही खाक झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल उशिरा पोहचल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. अखेर गावकर्‍यांनीच ही आग  विझवली. रानतळोधी हे गाव ताडोबा प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात असल्याने गावात प्रवेश करण्यासाठी विविध प्रकारच्या परवानग्या पार कराव्या लागतात. त्यातच  दूरध्वनी अथवा मोबाईल रेंज नसल्याने गावातील आगीची माहिती मिळण्यास अग्निशमन दलाला बराच उशीर झाला. तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होते.
यावेळी गावातील युवकांच्या दोन गटांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. एका गटाने उरलेली घरे वाचविण्यासाठी मदत सुरु केली तर दुसरा गट आसपासच्या  विहिरीतून बैलगाडयातून  पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण तोवर अनेक घरं जळून खाक झाली होती.