Breaking News

भारत-मॉरिशसमध्ये 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्याबाबत करार

नवी दिल्ली, दि. 28 - मॉरिशसला 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यासाठी आज भारत-मॉरिशसमध्ये महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. दोन्ही देशांच्या समुद्र किना-यांसह विविध क्षेत्रांत परस्परांतील संबंध आणखी दृढ करण्याबाबतही सहमती दर्शवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यात प्रदीर्घ चर्चेअंती दोन्ही देशांत सागरी सुरक्षा क्षेत्रातील करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. आर्थिक व्यवहारातून फायदा होण्यासाठी हिंदी महासागरातील धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम व्यवस्था तयार करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. द्विपक्षीय सागरी करारांतून परपस्परांतील सहकार्य व क्षमता अधिक मजबूत होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज झालेल्या करारातून 50 कोटी डॉलर कर्ज दिल्याने मॉरिशसच्या विकासात भारताची मजबूत व नियमित कटीबद्धतेचे चांगले उदाहरण आहे. दोन्ही देशांत व्यापार व गुंतवणूकीसह अनेक क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला. मॉरिशसमध्ये सुरू असलेल्या विकासाच्या कामांमध्ये सक्रीय हिस्सा असल्याने भारताला गौरव वाटत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. या बैठकीत एकूण चार विषयांवरील करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या.