Breaking News

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण : 16 जून रोजी अंतिम निकाल

मुंबई, दि. 29 - मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम आणि मुस्तफा डोसाबद्दल कोर्ट काय निर्णय देतं याकडे फक्त मुंबई नव्हे तर देशाचं  लक्ष लागलं होतं. मात्र मुंबईतल्या विशेष टाडा कोर्टाने निकाल 16 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण  मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो  आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला.
या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि  अब्दुल कयूम यांचा समावेश आहे. या सर्वांवर आरोप निश्‍चित केले असून ते दोषी आहेत की नाही, याचा निकाल विशेष टाडा न्यायालयाने पुढे ढकलला आहे.  साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार  सुनावली आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद  इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत. दुसरीकडे कोर्टाने अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला दोषी ठरवत  पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. संजय दत्त ही शिक्षा भोगून आता बाहेर आला आहे.