Breaking News

यंदा देशात 100 टक्के पाऊस

मुंबई, दि. 10 - यंदा सरासरीइतकंच पाऊसमान असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. यंदा 100 टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. आधीच्या अंदाजानुसार 96 टक्के पावसाचं भाकित करण्यात आलं होतं. दरम्यान, एल निनोचा प्रभाव कमी राहण्याचा अंदाज असल्यानं पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 96 ते 104 टक्के पाऊस म्हणजे सरासरी पावसाचं परिमाण आहे.
हवामान विभागाच्या चांगल्या पावसाच्या अंदाजानंतर आता शेअर बाजारानंही उसळी घेतली आहे. आज बाजार उघडताच शेअर बाजार 160 अंकांनी वधारला आणि त्यानं 30 हजारांचा टप्पा पार केला. चांगल्या पावसाच्या या बातमीमुळं बाजारात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. मागच्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला होता. आयएमडीच्या दुसर्‍या अंदाजातही सरासरीपेक्षा जास्तच पाऊस राहील असं भाकीत होतं. मात्र मागच्या वेळी सरासरीच्या 97 टक्के इतका पाऊस पडला.
अल निनो म्हणजे काय तर प्रशांत महासागरात अचानक उष्मा वाढल्याने वातावरणात जे असामान्य बदल घडून येतात, ज्याचा मान्सूनच्या वाटचालीवरही परिणाम होतो. भारतात जून ते सप्टेंबर या काळात जवळपास 70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सून वार्‍यांमुळेच पडतो, ज्यावर देशातली बहुतांश शेतीचं सिंचन अवलंबून आहे.