Breaking News

काश्मीरमधील तणाव कमी करण्यासाठी मेहबूबा मुफ्ती पंतप्रधानांना भेटणार ?

नवी दिल्ली, दि. 23 - काश्मीर खोर्‍यात देशविरोधी घटकांकडून सुरू असलेल्या कारवायांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही. सुरक्षा दलांकडूनही त्या विरोधात मोहिम सुरू आहे. दगड फेकणार्‍यांवर लष्कर व निमलष्करी दलांनी कोणत्याही प्रकारची आस्था दाखवू नये. त्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करावी, यासाठी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती दिल्लीत दाखल झाल्या असून त्या पंतप्रधान, केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
भाजप व पीडीपी यांच्यातील काही मुद्यांवर मतभेद आहेत, तेही या माध्यमातून सोडवले जातील, असे भाजपमधील काही जणांचे म्हणणे आहे.
दरम्यान जम्मू-काश्मीरच्या विधान परिषदेतील निवडणुकीत पीडीपीचा उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे पक्षातील काही जणांचा भाजपला विरोध असल्याचे बोलले जात आहे. परिषदेत भाजप व पीडीपीला प्रत्येकी दोन जागा मिळण्याची अपेक्षा असताना एका आमदाराने भाजपला मतदान केल्याने पीडीपीच्या उमेदवाराचा पराभव झाला. दरम्यान पीडीपीच्या नेत्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे पराभव झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. यामुळे एकीकडे भाजपशी संबंध ठेवून दुसरीकडे खो-यातील पक्षाचे वर्चस्व कमी करत असल्याचे पीडीपीमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्यावर पक्षांतर्गत दबाव असला तरी नजीकच्या काळात भाजपशी आघाडी तुटण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सूत्रांकडून समजते.