Breaking News

‘धुर्यावरची हिरवी झाडे जाळणार्‍यांवर कारवाई करा’: वृक्षप्रेमींचे निवेदन

बुलडाणा, दि. 20 - शेतातील पालापाचोळा जाळत असतांना धुर्यावरची झाडेही जाळली जात असून याला पायबंद घालावा आणि हे दुष्कृत्य करणार्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी बुलडाणा शहरातील वृक्षप्रेमींनी  आज एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी सदर निवेदनाचे स्वागत करीत याप्रकरणी गंभीरतेने पाऊले उचलण्याचे संकेत निवेदनकर्त्यांना दिले.
मागील वर्षी शासनाने मागील वर्षी शासनाने ‘एकच लक्ष्य, दोन कोटी वृक्ष’ या योजनेअंतर्गत सर्वत्र वृक्षारोपण घडवून आणले होते. शासनाच्या विविध विभागांसह अनेक सामाजिक संघटनांनी स्वयंस्फूर्तिने यात आपला सहभाग नोंदविला होता. गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी ही वृक्षे बहरली सुद्धा.. परंतु रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे अज्ञात व्यक्तींकडून जाळली जात आहे. शेतीच्या मशागतीच्या कामात पालापाचोळा जाळतांना धुर्यावर असणारी ही झाडेही जळत आहेत. केवळ नवीनच नव्हे तर जुन्या वृक्षांनाही या आगीची झळ पोहोचत आहे. परिणामी मोठ्या कष्टाने आणि उत्साहाने केलेले वृक्षारोपण निरर्थक ठरत असल्याचे सांगत भादोला, धोडप, मोताळा तसेच बोथा मार्गावर ही जळालेली झाडे दिसून येत असल्याचे निवेदनात नमूद आहे. पुढे मागणी करतांना म्हटले आहे की, झाडे जाळण्याचे दुष्कृत्य करणार्यांना योग्य ते शासन करण्यात यावे तसेच वृक्ष संरक्षणासाठी विशेष पथक नेमून संबंधित विभागाकडून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी प्रतिभाताई भुतेकर, शिवशंकर गोरे, डी.एम. कापसे, प्रसन्न एंडोले, अरविंद होंडे, रणजीतसिंग राजपूत, देवेंद्र खोत, जयंत दलाल, सुधीर देशमुख, दीपक मोरे, ऍड. राहुल मेहेर, संदीप वांत्रोळे, लखन गाडेकर, मोहन पर्हाड, अनुप श्रीवास्तव, उमाकांत मिसाळ, सचिन परांडे इत्यादी वृक्षप्रेमींनी जिल्हाधिकारी डॉ. झाडे यांची भेट घेवून त्यांना सदर प्रकाराचे फोटोही दाखविले. याविषयी डॉ. विजय झाडे यांनीही चिंता व्यक्त केली. याप्रकरणी तातडीने योग्य ते पाऊल उचलण्याचे आश्‍वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.