अॅड.रावळे यांचे आमरण उपोषण
अवैध रेतीउपसामुळे होणार्या पुर्णा नदीच्या जलप्रदुषणाविरोधात.....
बुलडाणा, दि. 20 - पुर्णा नदीपात्रात अवैधरित्या बोट मधुन रेती उपसा होत आहे. या बोटीतुन निघणार्या डिझेलमुळे नदीपात्रातील पाणी दुषित होत आहे. या दुषित पाण्यामुळे शहर वासियांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत जळगांव व बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदने देवुनही कार्यवाही न झाल्याने नगराध्यक्ष अॅड.हरिष रावळ यांचेसह नगरसेवक तथा आरोग्य सभापती राजु पाटील, पाणी पुरवठा सभापती अनिल गांधी, जेष्ठ नगरसेवक अनिल जैस्वाल, नगरसेवक जाकीर मेमन यांनी आज 19 एप्रिलपासुन पुर्णा माईच्या नदीपात्रातील जॅकवेलवर आमरण उपोषण सुरू केले.मलकापूर शहराला श्रीक्षेत्र धुपेश्वर येथून पुर्णा नदी पात्रातुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र गत महिना भरापासून याच पुर्णा नदीपात्रात उपसा विहिरीजवळ रेती माफीयांनी नदी पात्रात मोठी बोट टाकून रेतीचा अवैधरित्या उपसा चालविला आहे. या बोटीद्वारे विषारी धुर, द्रव्य तसेच डिझेल पाण्यात मिसळून या द्रव्याचा थर पाण्यावर तरंगतांना दिसत आहे. हेच पाणी पाईप लाईनद्वारे शहरातील पाणी पुरवठा विभागातील जलशुध्दीकरण केंद्रावर शुध्दीकरण केले जाते. परंतू तरीही या पाण्याचे पाहिजे त्या प्रमाणात शुध्दीकरण होत नाही. त्यामुळे या पाण्याची दुर्गंधी येते व हेच पाणी शहर वासियांना प्यावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येवून त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात याआधी बुलडाणा तथा जळगांव जिल्हाधिकार्यांना तसेच स्थानिक महसूल प्रशासनाला निवेदन देवून त्यांच्यावर उचित कार्यवाही करण्याची मागणी अॅड.हरिश रावळ यांनी केली होती. मात्र त्याकडे संंबंधित प्रशासनाने दुर्लक्ष करीत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आज नगराध्यक्ष अॅड.हरिश रावळ यांनी एक लाख जनतेच्या हितास्तव पुर्णा नदीपात्रातील जॅकवेलवर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये अॅड.रावळ यांच्यासह नगरसेवक तथा आरोग्य सभापती राजु पाटील, पाणी पुरवठा सभापती अनिल गांधी, जेष्ठ नगरसेवक अनिल जैस्वाल, नगरसेवक जाकीर मेमन सहभागी झाले.
या उपोषणाला न.प.उपाध्यक्ष हाजी रशिदखॉ जमादार, न.प.काँग्रेस गटनेते राजेंद्र वाडेकर, माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी, गजानन ठोसर, अशोक जाजु, सुनिल बगाडे यांच्यासह इतरांनी भेटी देवून उपोषणाला पाठींबा दर्शविला आहे.