Breaking News

महामार्गावर बेकायदा दारू वाहतूक

शिरवळ, दि. 20 (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूर महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत कारमधून बेकायदा देशी-विदेशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक करून सुमारे 1 लाख 55 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 
पुणे-बंगळूर महामार्गावर पोलीस निरीक्षक पांढरे यांनी शिरवळचे सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग हजारे यांना पांढर्‍या रंगाच्या कारमधून दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानुसार महामार्गावर शिर्के कंपनीनजीक पोलीस दशरथ तळपे, पांडुरंग हजारे, शेडगे, घोरपडे, पवार, जाधव यांनी टेहळणी सुरू केली. त्यावेळी पांढर्‍या रंगाच्या इंडिका संशयितरित्या आढळून आली.
संशयित कारला थांबवून पोलिसांनी चालक गजानन शामराव जाधव (वय 33 रा. होडी भादे, ता. खंडाळा) याच्याकडे चौकशी केली असता त्याने कारमध्ये (एमएच 06 डब्ल्यू 9261) विनापरवाना दारू व बियरचे बॉक्स असल्याची माहिती दिली. संशयित कारमधून पोलिसांनी तीन बॉक्समध्ये मॅक्डॉल कंपनीच्या 120 दारूच्या बाटल्या, 24 हजारांच्या ब्लू कंपनीच्या दारूच्या 192 बाटल्या, 9 हजार 600 रूपयांच्या 96 बियरच्या बाटल्या, 1200 रूपयांच्या 12 बियरच्या बाटल्या व 1 लाख किंमतीची इंडिका कार असा 1 लक्ष 55 हजार 800 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यास अटक केली.