Breaking News

स्त्री जन्माचे स्वागत करून मुलींचा नामकरण सोहळा संपन्न

अहमदनगर, दि. 08 - श्रीरामनवमी हिंदू धर्माचा पवित्र सण आहे. यानिमित्त श्रीराम सेवा कमिटीच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यंदाही धार्मिक कार्यक्रमाबरोबरच समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यास चांगला प्रतिसाद लाभला. मागील तीन वर्षांपासून कमिटी कार्यरत असून, अपंगांना मोफत सायकली, सामुदायिक विवाह सोहळा असे उपक्रम राबविले असून, यंदा अनोख्या पद्धतीने श्रीरामनवमी साजरी करीत स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले, तसेच दोन मुलींचा नामकरण सोहळाही संपन्न झाला. महिलांमुळे समाजात नातं मिळते, त्यामुळे समाजामध्ये गोडवा निर्माण होतो, असे प्रतिपादन नगरसेवक कुमार वाकळे यांनी केले.
श्रीरामनवमीनिमित्त बोल्हेगाव, भारतनगर येथे श्रीराम सेवा कमिटीच्या वतीने सालाबादप्रमाणे धार्मिक कार्यक्रम, श्रीरामजन्मोत्सव साजरा करण्यात आला, तसेच स्त्री जन्माचे स्वागत करीत दोन मुलींचा नामकरण सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री. वाकळे बोलत होते. याप्रसंगी मोहनमहाराज पडोळे, आसाराम पा. कातोरे, आबा कातोरे उपस्थित होते.
मोहनमहाराज पडोळे म्हणाले की, उत्सव असो वा सण येथील नागरिक एकत्र येऊन तो पार पाडतात. 7 दिवस श्रीरामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सप्ताहात नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. यामध्ये कीर्तने व प्रवचने संपन्न झाली.