Breaking News

अमेरिकेत भारतीय तरुणाची हत्या

वॉशिंग्टन, दि. 09 - अमेरिकेत पुन्हा एका भारतीय तरुणाची हत्या झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री अमेरिकेच्या राजधानीत ही हत्या झाली असून, विक्रम जरयाल असं मृत तरुणाचं नाव आहे. मात्र, पोलिसांनी ही हत्या वर्णद्वेषातून झाल्याची शक्यता फेटाळली आहे.
गुरुवारी याकिमी सिटीच्या एएम - पीएम गॅस स्टेशनवरी एका दुकानात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत्यू झालेला विक्रम जरयाल एका स्टोअरमध्ये क्लार्कचे काम करत होता. मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती स्टोअर लुटण्याच्या उद्देशाने आले. त्यांनी स्टोअर्समधील पैसे लुटल्यानंतर विक्रमवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर विक्रमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
विक्रम पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून, तो एक महिन्यांपूर्वीच नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेला असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. विक्रमच्या हत्येनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन विक्रमच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. तसेच त्याचे शव भारतात परत आणण्यासाठी भारतीय दूतावासाला सूचना दिल्या असल्याची माहिती दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांत वर्णद्वेषातून भारतीय वंशियांच्या हत्येचं प्रमाण वाढलं आहे. फेब्रुवारीमध्ये अमेरिकेतून चालता हो, अशी धमकी देत श्रीनिवासन कुचीभोतला या 32 वर्षीय इंजिनिअरची हत्या झाली. यानंतरही हत्या आणि जीवघेण्या हल्याचं सत्र सुरुच आहे. 23 फेब्रुवारी रोजी मुळची आंध्र प्रदेशची रहिवाशी असलेल्या शशिकला आणि तिच्या सात वर्षांच्या चिमुरडीची हत्या करण्यात आली.